आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या १ हजार २५४ फेऱ्या रद्द; विरोध करणाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून संपाचे हत्यार उपसले आहे. एसटीच्या दररोज होणाऱ्या १ हजार २५४ फेऱ्या रद्द झाल्या असून अवघ्या ४२० फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. बसगाड्या अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन ते तीन जणांवर गुन्हे दाखल करून सेवा समाप्तीसारखी कडक कारवाई करण्याचे संकेत एसटी प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, संपामुळे सामान्य प्रवाशांचे मोठे हाल झाले असून त्याचा फायदा खासगी वाहतूकदारांनी घेतला आहे. 


एसटी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून संपाचे हत्यार उपसले आहे. जिल्ह्यात ११ आगार असून त्यात सुमारे ७३० बसगाड्यांमार्फत प्रवासी सेवा दिली जाते. परंतु, संपाचे हत्यार उपसल्यामुळे बसचे चाक थांबले. जिल्ह्यात तारकपूर, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, कोपरगाव, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदे, नेवासे, पाथर्डी, अकोले येथे आगार आहेत. या आगारातून दररोज १ हजार ६७४ बसगाड्या प्रवासी वाहतुकीसाठी सुटतात. त्यापैकी सायंकाळी चार वाजेपर्यंत ४२० फेऱ्या झाल्याची नोंद एसटी प्रशासनाने केली आहे. रद्द झालेल्या फेऱ्यांची संख्या १ हजार २५४ वर पोहोचली होती. बसचे चाक थांबल्याचा फायदा खासगी वाहतूकदारांनी घेऊन मनमानी पद्धतीने भाडे आकारणी केली. प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असले, तरी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत सरकार धोरणात्मक ठोस निर्णय घेत नसल्याने वारंवार संपासारखे हत्यार कर्मचाऱ्यांना उपसावे लागल्याचे बोलले जात आहे. 


जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, संगमनेर आगारात कडकडीत बंद पाळण्यात आला. उर्वरित ठिकाणी अत्यल्प प्रमाणात बसेस सुरू होत्या. ज्या बसेस अडवण्याचा प्रयत्न झाला, अशा ठिकाणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.


दोन जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश 
शेवगावमध्ये बसगाड्या अडवण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधितांवर कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी निलंबन तसेच सेवा समाप्ती कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- व्ही. एन. गीते, विभाग नियंत्रक, एसटी, नगर. 


आम्ही कारवाईला घाबरत नाही 
जोपर्यंत आमच्या मागणीप्रमाणे पगारवाढ होत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरू आहे. शिवशाही नावाने सुरू केलेल्या खासगी बसेसलाही आमचा विरोध आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास संप सुरूच ठेऊ. आम्ही कारवाईच्या कोणत्याही निर्णयाला घाबरत नाही. आंदोलन सुरूच राहील.
- अरुण दळवी, सरचिटणीस, कर्मचारी संघटना. 


तारकपूरच्या ५० टक्के गाड्या सुरू 
तारकपूर आगारातून दररोज सुमारे ३५० बसगाड्यांच्या फेऱ्या होतात. त्यापैकी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १६८ फेऱ्या रद्द झाल्या. या आगाराचे रोजचे उत्पन्न १० लाख होते, त्यापैकी समारे ५ लाख ६५ हजाराचे उत्पन्न बुडाले. आम्ही कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याचे आवाहन केले आहे.
- अविनाश कल्हापुरे, आगार व्यवस्थापक, तारकपूर. 


४० लाखांचे नुकसान 
जिल्ह्यात बसेसच्या दररोज १,६७४ फेऱ्या होतात. यापोटी महामंडळाला दररोज ६५ लाखांचे उत्पन्न मिळते. पण संपामुळे ४२० फेऱ्याच होऊ शकल्या. त्यामुळे महामंडळाला सुमारे ३५ ते ४० लाखांचे नुकसान झाले असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...