आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवज्योतीसाठी जाताना दोघा मित्रांचा अपघाती मृत्यू, खंदरमाळजवळ अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरनजीक खंदरमाळ येथे दुचाकी आणि कंटनेरची धडक होऊन दुचाकीवरील दोन शिवभक्त मित्रांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री अकराच्या सुमारास हॉटेल बिकानेरसमोर हा अपघात झाला. संतोष मधुकर सातपुते (वय २९) आणि संतोष बबन खरे (३८) अशी मृतांची नावे आहेत.

 

मालदाड रस्ता परिसरातील हे दोघे युवक दुचाकीवरुन (एम. एच. १७ जे ४७७७) शिवनेरी किल्ल्यावर (जुन्नर) शिवज्योत आणण्यासाठी निघाले होते. खंदरमाळवाडी शिवारातील महामार्गाच्या कडेला असलेल्या हॉटेल बिकानेरमध्ये थांबलेला कंटेनर (आर. जे. ०१ जेबी ६३५१) मुख्य रस्त्यावर येत होता. या कंटेनरलगत उभ्या असलेल्या अन्य कंटेनरमुळे तो दुचाकीस्वारांना दिसला नाही. त्यांची दुचाकी कंटेनरला धडकली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.

 

जवळच असलेल्या पोलिस ठाण्याला अपघाताची माहिती मिळूनदेखील रात्री उशिरापर्यत दोन्ही जखमींना मदत मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालकाने पळ काढला. या मार्गावर गेल्या तीन महिन्यांत झालेल्या अपघातातील हा चौथा मृत्यू आहे. रस्त्यावरच अवजड वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहनांमधील मालाची परस्पर विक्रीदेखील करण्याचे प्रकार येथे सर्रास सुरु असतात. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या या अवैध धंद्याला ढाबाचालकांचे संरक्षण मिळते आहे.

 

बातम्या आणखी आहेत...