आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळा 200 कोटींचा दंड फक्त 200 रुपये, 4 वर्षांपूर्वीचे चारा घोटाळा प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दुष्काळात जनावरे जगवण्यासाठी २०१२ ते २०१४ मध्ये सुरू केलेल्या चारा छावण्या, चारा डेपोंमध्ये गैरव्यवहार आढळल्याने या संस्था चालकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. श्रीगोंदे, नेवासे, पाथर्डी, नगर तालुक्यांतील छावणी चालवणाऱ्या १२६ संस्थांवर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या गैरव्यवहाराची एकूण व्याप्ती तब्बल २०० कोटींमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, ज्या कलमान्वये अाता गुन्हे नोंदवले जात आहेत. त्यात दोषी आढळल्यास केवळ १ महिना कैद व अवघ्या २०० रुपये दंडाची तरतूद आहे.

 

२०१२-१३, २०१३-१४ या कालावधीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. पशुधन वाचवण्यासाठी सरकारने दुष्काळी गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात जिल्ह्यातील ११ तालुक्यांत ७०० हून अधिक चारा छावण्या, चारा डेपो सुरू केले होते. गावांतील सहकारी सोसायटी, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत सरकारी अनुदानावर चारा छावण्या, चारा डेपो सुरू करण्यात आल्या होत्या.

 

मात्र अनेक छावण्यांमध्ये अार्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत चारा छावण्या, चारा डेपोची तपासणी केली होती. त्यात जिल्ह्यातील ४२६ चारा छावण्या चालवणाऱ्या संस्थांमध्ये अनियमितता आढळली. जनावरांची संख्या जास्त दाखवणे, वेळेवर चारा उपलब्ध करून न देणे, असे काही प्रकार आढळले होते. त्यामुळे अनियमितता असलेल्या संस्थांना प्रशासनाने दंड करून वसुलीही केली होती. मात्र, अनियमितता आढळणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया मात्र प्रलंबित होती. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंडळाधिकाऱ्यांमार्फत हे गुन्हे नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांत १२६ संस्थांविरुद्ध अनियमितता प्रकरणांत गुन्हे नोंदवले अाहेत. श्रीगोंदे तालुक्यात सर्वाधिक ८१ संस्थांवर गुन्हे नोंदवले असून, त्यात सेवा सहकारी संस्था अधिक असून, सेवा संस्थांच्या अध्यक्षांविरुद्ध हे गुन्हे आहेत.

 

श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीने काही चारा छावण्या सुरू केल्या होत्या. बाजार समितीच्या चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळल्याने तत्कालीन सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नेवासे तालुक्यात ९, पाथर्डी तालुक्यात १४, नगर तालुक्यात २२ छावण्या चालकांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. उर्वरित तालुक्यांमध्येही चारा छावण्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत. याशिवाय अनियमितता आढळणाऱ्या सर्वच ४२६ संस्थांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे. आतापर्यंत २१० संस्थांना काळ्या यादीत टाकल्या आहेत. त्यामुळे भविष्यात टंचाई उपाययोजनांमध्ये या संस्थांना चारा छावण्या, चारा डेपो सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

 

फसवणुकीचे कलम लावा
जिल्ह्यात १२६ चारा छावणी चालकांवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार गुन्हे नोंदवण्यात अाले आहेत. मुळात या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास २०० कोटी आहे. पण जे कलम लावले त्यानुसार चारा छावणी चालकांना अतिशय किरकोळ शिक्षेची तरतूद आहे. या संस्थांमध्ये आर्थिक अनियमितता आढळल्याने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हाही नोंदवायला हवा. मात्र प्रशासनाने तसे केलेले नाही.
- काका गायके, याचिकाकर्ते.

बातम्या आणखी आहेत...