आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा क्षेत्रात २४ तासांत १४ इंच पाऊस; रतनवाडी येथे धुवांधार! मुळा वाहती झाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- दोन दिवसांपूर्वी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने चिंतातूर झालेल्या आदिवासी भागातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले होते, पण सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाने त्याला मोठा दिलासा मिळाला. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत तब्बल १४ इंच (३५५ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल पांजरे येथे ९ इंच (२२१ मिलिमीटर), भंडारदरा येथे १८७ व घाटघर येथे १०५ मिलिमीटर पाऊस पडला. अंबित धरण भरल्याने मुळा नदी वाहती झाली आहे. 


मृगाच्या सरी पाहिजे त्या प्रमाणात पडल्या नाहीत. पावसाने दडी मारल्याने शेतकरी भाताची रोपे तयार करण्याबाबत साशंक होते. मात्र, २२ जूनपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रात मोसमी पावसाने धुवांधार बरसात केली. मंगळवारी तर ढगफुटी व्हावी, असा धोधो पाऊस बरसला. एकूण ११०३९ दलघफू क्षमतेच्या धरणात सध्या २७.०७ टक्के (२९८९ दलघफू) साठा आहे. निळवंडे धरणातील साठा ६५५ दलघफू (७.८७ टक्के) अाहे. मुळा धरणातील साठा ४७४९ दलघफू (१८.२६ टक्के) आहे. १०६० दलघफू क्षमतेच्या आढळा धरणात १७४ दलघफू (१६.४१ टक्के) साठा आहे. 


पावसाची नोंद पुढीलप्रमाणे - (कंसात आतापर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये) - घाटघर १०५ (६६९), रतनवाडी ३५५ (५०५), पांजरे २२१ (४४३), भंडारदरा १८७ (३७४), निळवंडे धरण ५९ (१२९), देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्प १० (७७), अकोले ८७ (१७३), कोतूळ २३ (८९). 


वीज निर्मितीसाठी भंडारदरा धरणाच्या उन्नेन विहिरीतून ७८८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरणातून भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी १००० क्युसेक विसर्ग प्रवरेच्या पात्रात सुरू आहे. भंडारदरा धरणात मंगळवारी सकाळी सहा वाजता २२१ दलघफू नवीन पाणी आले. या वर्षात १ जूननंतर १०२१ दलघफू नवीन पाणी धरणात आले आहे. निळवंडे धरणातही मंगळवारी ९३ दलघफू व १ जूननंतर ११२२ दलघफू नवीन पाणी आले आहे. मुळा खोऱ्यातील १९३ दलघफू क्षमतेचा अंबित लघुपाटबंधारे प्रकल्प रविवारी पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला. 


पावसाने भात खाचरे तुडुंब भरली आहेत. काही ठिकाणी शेतीचे बांध फुटल्याने मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले, विजेचे खांब पडले. वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसर अंधारात आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली. अतिवृष्टी झाल्याने जनावरांना संरक्षण देण्याबाबत गैरसोय निर्माण झाली. थंडी पडल्याने गारठला. थंडीपासून बचाव करण्यासाठी घरात धुनी पेटवल्या आहेत. विद्यार्थीच न आल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या . अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे यांनी केली आहे. 


आल्हाददायक वातावरण 
दोन दिवसांपासून हरिश्चंद्रगड व मुळा खोऱ्यात धुवांधार पावसाने हजेरी लावली. अंबित लघुपाटबंधारे प्रकल्प सर्वप्रथम भरल्याने मुळा काठावरील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मुळा खोऱ्यात अंबितसह बलठण, देवहंडी, कोथळे, शिरपुंजे, घोटी -शिळवंडी या लघुपाटबंधारे प्रकल्पांतही पाण्याची आवक सुरु झाली आहे. ओढे-नाले वाहू लागले. डोंगरमाथ्यावरून छोटे जलप्रपात पडू लागल्याने वातावरण अाल्हाददायक बनले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या हौशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी परिसरात चांगले वातावरण आहे. 


पेरणीसाठी पोषक वातावरण 
पाचनई, शिरपुंजे, कुमशेत भागातही संततधार सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी धाडस करत गरे भाताची रोपे तयार करण्यासाठी 'राब' टाकले होते. त्यांच्या आवण्या आगाद होऊ शकतील. पण बहुतेक शेतकऱ्यांनी पावसाने ओढ दिल्याने अद्यापही राब टाकले नसल्याने त्यांनी आता हळे भातासाठी रोपे तयार करण्याची सुरुवात केली आहे. अशा शेतकऱ्यांना भाताची लागवड करण्यासाठी रोपे उशिरा हाती येतील. बिगर आदिवासी भागातील शेतकरीवर्ग तालुक्यात सर्वदूर पाऊस पडल्याने खरीप हंगामासाठी मशागत करण्यात गुंतले आहेत. आणखी थोडासा पाऊस पडला, तर पेरणीसाठी पोषक वातावरण तयार होईल.

बातम्या आणखी आहेत...