आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापूरच्या धर्तीवर मीटरने २४ तास पाणी! योजना पाहायला येण्याचे राहुरीच्या नगरसेवकांना निमंत्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- मलकापूर नगर परिषदेच्या धर्तीवर राहुरीच्या जोगेश्वरी पाणी योजनेतून मीटर पध्दतीने २४ तास पाण्याचा पुरवठा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 


मलकापूरचे नगराध्यक्ष भाऊ शिंदे यांनी राहुरी भेटीत या योजनेची माहिती देऊन योजना पहायला येण्याचे निमंत्रण राहुरीच्या नगरसेवकांना दिले. तीस हजार लोकसंख्या असलेल्या मलकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच असताना भाऊ शिंदे यांनी २४ तास पाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ केला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंते बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यशस्वी झाली. ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर ग्रामपंचायत काळातील मीटर पध्दतीने २४ तास पाणी पुरवठा वितरण व्यवस्था आजही सुरळीत सुरु आहे. सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाला प्रारंभी विरोध झाला. मात्र, कालांतराने हा विरोध निवळून मीटर पध्दतीने पाणी वितरण व्यवस्थेवर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांचे एकमत झाले. 


या व्यवस्थेत पाण्याचा पूर्ण दाबाने पुरवठा होत असल्याने नागरिकांना विजेचे बिल कमी झाले आहे. पाणी वापराल तेवढ्याच बिलाची नगर परिषदेकडून आकारणी केली जाते. वर्षाऐवजी प्रत्येक महिन्याला बिलाची आकारणी केली जात असून महिला बचत गटाला बिलवाटपाचे काम देण्यात आले आहे. माणशी ७० लिटर पाणी या शासनाच्या निकषाप्रमाणे १ हजार लिटर पाण्याला ४ रूपये ५० पैसे याप्रमाणे सरासरी महिन्याला १५० ते २०० रूपये पाणीपट्टी आकारली जात असल्याची माहिती नगराध्यक्ष शिंदे यांनी दिली. मलकापूरमध्ये जलजन्य आजाराने गेल्या १० वर्षांत एकही रूग्ण आढळून आलेला नाही. ही जमेची बाजू ठरली आहे. 


मलकापूरच्या धर्तीवर राहुरीच्या जोगेश्वरी या नवीन पाणी टाकीच्या लाभक्षेत्रात मीटरने पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ५०० नळधारकांसाठी २४ तास पाणी पुरवठा करण्याची ही योजना अाहे. जोगेश्वरी परिसरातील पाण्याच्या टाकीवर २५० नळ कनेक्शन नोंद झाली आहे. उर्वरित २५० कनेक्शन झाल्यास हा प्रयोग सुरू होण्याची दाट शक्यता आहे. 


मलकापूरच्या नगराध्यक्षांशी चर्चा 
मलकापूरचे नगराध्यक्ष शिंदे, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मलकापूर येथील अभियंते बागडे यांच्या राहुरी भेटीत झालेल्या चर्चेत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, गजानन सातभाई, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, अक्षय तनपुरे, पाणी पुरवठा विभागप्रमुख काकासाहेब अढागळे, सुनील कुमावत, आरोग्य विभागप्रमुख भास्कर आल्हाट यांनी भाग घेतला. 

बातम्या आणखी आहेत...