आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा सण रविवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. घरापुढे गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केली होती. सोन्याबरोबर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाइल आणि वाहनांची खरेदी करत पाडव्याचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. अनेकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन घराची नोंदणी केली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफ बाजार, वाहन बाजार, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ४० कोटींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
होळी, धुळवड व रंगपंचमीनंतर येणारा सर्वात मोठा सण गुढीपाडव्याचा असतो. गुढीपाडव्याच्या सणापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षातील हा पहिलाच सण. रविवारी गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी प्रवेशद्वाराला झेंडू व आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्यात आले होते. त्याचबरोबर दारासमोर सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळी नवे कपडे परिधान करुन पारंपरिक पध्दतीने घरोघरी गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत करण्यात आले. वर्षातला पहिलाच सण असल्यामुळे घरोघरी गुढीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला होता. या दिवशी कडूनिंबाची पाने, साखर व गूळ खाण्याची पध्दत आहे. नागरिकांनी घरोघरी जाऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
गुढीपाडव्याच्या सणासाठी गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठ सज्ज झाली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी साेने व चांदीचे दागिने खरेदी करणे, वाहन व गृह खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे शहरातील सराफ बाजार, वाहन बाजार, कापडबाजार गर्दीने फुलून गेला होता. गुढीपाडव्यानिमित्त सराफ दुकानांमध्ये महिलांसाठी खास दागिने विक्रीसाठी आलेली होती. त्यात कमी वजनाच्या दागिन्यांना मोठी मागणी होती. त्याचबरोबर पारंपरिक असलेली नथ, मोरणी, हार, बांगड्या, अंगठ्या व नक्षीकाम असलेल्या दागिन्यांनाही मागणी होती. सोन्याच्या दागिन्याबरोबरच चांदीच्या दागिन्यांनाही यंदा चांगली मोठी मागणी होती. रविवारी सोन्याच्या भावात काही प्रमाणात घसरण झाली होती. दहा ग्रॅमला ३१ हजार ३०० रुपये असा सोन्याला भाव होता. चांदीला ३८ हजार रुपये किलो होती.
वाहन बाजारातदेखील वाहन खरेदीला मोठा प्रतिसाद होता. शहरात विविध कंपन्यांची चार चाकी व दुचाकी विक्रीची शोरुम आहेत. दुचाकी विक्री करणाऱ्या शोरुममध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. तीच गर्दी चारचाकी वाहन विक्री करणाऱ्या शोरुममध्ये होती. सराफबाजार व वाहन बाजारात दिवसभरात सुमारे ३५ कोटींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात देखील एलडी, फ्रीज, मोबाइल, वाशिंग मशीनसह अन्य इलेक्टॉनिक्स वस्तू खरेदीसाठी चांगली गर्दी होती.इलेक्टॉनिक्स बाजारात दिवसभरात सुमारे पाच कोटींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
एटीएममध्ये खडखडाट
गुढीपाडव्यानिमित्त बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी उसळली असताना शहरातील बहुतांशी एटीएममध्ये रक्कम शिल्लक नव्हती. त्यामुळे ग्राहकांची मोठे हाल झाले. एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे ग्राहकांनी थेट डेबिट कार्ड, एटीएम कार्डद्वारे वस्तू खरेदी केल्या. एटीएममध्ये रक्कम का नव्हती, याचा खुलासा झाला नाही.
मोबाइलचाही तुटवडा
गुढीपाडव्यानिमित्त बाजारात मोबाइल खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होती. अनेक दालनांमध्ये युवक-युवतींनी मोबाइल खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, अनेक दालनांमध्ये अपेक्षित मोबाइल फोन शिल्लक नव्हते. त्यामुळे अनेक ग्राहकांनी मोबाइल घेणे पुढे ढकलले.
घरोघरी गुढी उभारल्यानंतर नगरकरांनी सुवर्णालंकारांची खरेदी केली. काहींनी या शुभमुहूर्तावर नवे वाहन आपल्या घरी आणले. मोबाइललाही मोठी मागणी होती.
गृहखरेदीला चांगला प्रतिसाद
नगर शहरातील सावेडी, तपोवन रस्ता, केडगाव, भिंगार, नवनागापूर या परिसरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात गृह खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. काही ठिकाणी प्लॉटचे व्यवहार झाले. या प्लॉट खरेदी-विक्री व गृहखरेदीच्या व्यवहारातून सुमारे पंधरा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सराफ बाजारातील उलाढाल कमी
यंदा आर्थिक निकषांमुळे सराफ बाजारात सोन्याची दागिने खरेदीला कमी प्रतिसाद मिळाला. ५० हजारांपुढे दागिने खरेदीसाठी पॅन कार्ड दाखवणे, चेकद्वारे दागिने खरेदीचे बंधन घातल्यामुळेच सराफ बाजारातील उलाढाल कमी झाली.
- संतोष वर्मा, राज्य उपाध्यक्ष, राज्य सराफ सुवर्णकार-फेडरेशन.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.