आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत निळोबाराय पालखी सोहळ्यात ५१ दिंड्या; अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत पंढरीला प्रस्थान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुखा लागी करीसी तळमळ। तरी तू पंढरीसी जारे एक वेळा।। 

मग तू अवघची सुखरुप होसी । जन्मोजन्मीचे दुःख विसरसी ।। 

 

निघोज- वरील अभंगाप्रमाणे भक्तिमार्गतून कल्याण व्हावे, जन्मोजन्मीचे दुःख, पाप सर्व पंढरपूरला जाऊन निघून जाते. पालखी सोहळ्याच्याप्रसंगी डॉ. नारायण महाराज जाधव यांनी कीर्तनरूपी सेवेतून घेतलेल्या अंभगाच्या निरूपण करताना सांगितले. 


संत निळोबाराय दिंडी पालखी सोहळ्यात ५१ दिंड्या पंढरपूरला जाण्यासाठी सामील झाल्या आहेत. नेहरू शर्ट, धोतर, टोपी, केशरी गंध, बुक्का, टाळमृदंगाच्या निनादात ठेका धरत फुकडी खेळत पताका हाती घेऊन ज्ञानोबा तुकाबो निळोबा नामघोष करत पिंपळनेर नगरी दुमदुमून गेली. पारनेर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र पिपळनेर येथून संत निळोबाराय महाराज पालखी सोहळ्याचे हे दुसरे वर्षे आहे. रविवारी संध्याकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली. पालकमंत्री राम शिंदे, विष्णू महाराज पारनेरकर, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पडला. 


हजारे म्हणाले, हे पांडुरंगा, वारकऱ्यांना सुखरूप दर्शन दे. वारकऱ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, आपण पांडुरंगाच्या सेवेला जाणार आहोत. आपले विचार, आचरण शुद्ध ठेवले पाहिजे. जीवन निष्कलंक पाहिजे, तरच पंढरपूरची वारी केल्याचे पुण्य पदरी पडेल. पालकमंत्री शिंदे म्हणाले, हे पांडुरंगा, निळोबाराय मागील वर्षीप्रमाणे चालू वर्षीही चांगला पाऊस पडू दे व माझा शेतकरी राजा सुखी होऊ दे. निळोबारायांचा पालखी सोहळा हा तुमचा, आमचा, सर्वांचा असून यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीप्रमाणे निळोबाराय महाराज पालखी सोहळा झाला पाहिजे. भविष्यात तो होईल कारण या सोहळ्याला हजारे याचे आशीर्वाद आहेत. देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव माउली पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत व गावकऱ्यांनी ही दिंडी सुरू करून चांगला धार्मिक उपक्रम सुरू केला. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका राज्य शासनाची असून सर्व खात्यांना सूचना दिल्या आहेत. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा कमी पडणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी संत निळोबाराय दिंडी सोहळा सुरू करून संत निळोबाराय यांचा भक्तिमार्गाचा संदेश राज्यातील जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे, असे पाचपुते म्हणाले. 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, बबनराव गाजरे, दादासाहेब पठारे, सुरेश पठारे, प्रांताधिकारी दाणेज, उद्योगपती भगवान पठारे, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया झावरे, भाजप तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, वसंतराव चेडे, पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे उपस्थित होते. 


अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत पंढरीला प्रस्थान 
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय दिंडी सोहळ्याचे ज्ञानोबा-तुकारामाच्या गजरात पंढरपूर वारीसाठी प्रस्थान झाले. 

बातम्या आणखी आहेत...