आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून निघून गेलेला मुलगा नऊ वर्षांनंतर परतला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - घरातून निघून गेलेला मुलगा तब्ब्ल नऊ वर्षांनंतर सुखरूप घरी पोहचला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशेष पथकामार्फत या मुलाचा शोध घेतला. राहुल प्रभाकर पाटील (रा. आगरकर मळा, स्टेशन रोड) असे या मुलाचे नाव आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर मुलगा सुखरूप घरी परतल्याने आनंदित झालेल्या पाटील कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.

 

आगरकर मळा परिसरात राहणाऱ्या पाटील कुटुंबातील २० वर्षीय सदस्य राहुल १४ ऑक्टोबर २००९ राेजी अचानक घरातून निघून गेला. याप्रकरणी राहुलचे चुलत भाऊ लक्ष्मण प्रल्हाद पाटील यांनी कोतवाली पाेलिस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दिली होती. तेव्हापासून नातेवाईकांसह पोलिस राहुलचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार केले होते. पोलिस नाईक दिनेश मोरे, दीपक शिंदे, रवींद्र कर्डिले, रोहित मिसाळ यांनी राहुलचा शोध सुरू केला होता. दरम्यान, पवार यांना राहुल हा राजस्थानमधील एका गावात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी राजस्थानकडे रवाना झाले. राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील कपासन तालुक्यातील शनिमहाराज या गावात राहुल मिळून आला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेत नगर येथे आणले. सर्व चौकशी व माहिती घेतल्यानंतर राहुल याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घरातून निघून गेल्यानंतर राहुलने सुरुवातीला मुंबई येथे ट्रकवर क्लिनर म्हणून काम केले. त्यानंतर त्याचे अनेक ट्रकचालकांशी ओळख झाली. ट्रक चालवणे शिकल्यानंतर तो राजस्थान येथील चित्तोडगड येथे गेला. तेथे राहूनच तो ट्रक चालवू लागला. पोलिसांच्या मदतीमुळे तब्बल नऊ वर्षांनंतर मुलगा सुखरूप परत आल्यानंतर राहुलच्या नातेवाईकांना मोठा आनंद झाला. त्यांनी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.

 

अल्पवयीन मुलींची संख्या जास्त
शहर व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुले हरवलेली आहेत. बहुतेकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून गेलेले आहेत. पोलिस त्यांचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे त्यात अल्पवयीन मुलींची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. प्रेमप्रकरण, पळून जाऊन लग्न करत अनेकींनी संसार देखील थाटले असल्याची माहिती समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...