आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदचा हस्तक राहणेला संगमनेरमध्ये अटक; दुबईतील व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक, गँगस्टर रामदास राहणे याच्या मुसक्या मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने संगमनेरमध्ये आवळल्या. एका व्यावसायिकाच्या खंडणी प्रकरणात राहणेचा सहभाग असल्याचे समाेर अाल्याने दाऊदचे संगमनेर कनेक्शन उघड आले. शुक्रवारी (२२ जून) संगमनेरमध्ये ही कारवाई झाली, तरी स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती नव्हती. राहणेला ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात अाली. 


भारतातील एका व्यावसायिकाने दुबईत १९९९ ते २००१ दरम्यान हॉटेल सुरू केले होते. हॉटेलमालकाच्या एका मित्राने पाच लाख दिराम त्यात गुंतवले होते. मात्र २०११ मध्ये दाऊदच्या इशाऱ्यावरून मुंबईत या मित्राची हत्या करण्यात अाली हाेती. त्यानंतर दाऊदने या हॉटेल व्यावसायिकाला त्याच्या मित्राने गुंतवलेले पैसे परत करण्यासाठी धमकावले. हॉटेल व्यावसायिकाने दुबईतील हॉटेल विकून दाऊद गँगला पैसे दिले. त्यानंतरदेखील दाऊदच्या हस्तकांनी पाकिस्तानातून फोन करत पन्नास लाखांच्या खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. पाच लाख तत्काळ मुंबईतील हस्तकाला देण्याचे सांगितले होते. या हस्तकानेही पैशांसाठी हॉटेल व्यावसायिकाला धमकावले. 


या प्रकरणी हॉटेलमालकाच्या तक्रारीवरून मुंबईच्या गुन्हे शाखेने आरोपींचा शोध सुरू केला. यादरम्यान पैशांसाठी हस्तकाचे वारंवार फोन सुरूच होते. पोलिसांच्या तपासात हस्तकाला परदेशातून पैसे दिल्याचे पुढे आले, तसेच तो फिर्यादीवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी फिर्यादीला पोलिस संरक्षण दिले. खंडणीविरोधी आणि गुन्हे शाखेच्या तपासात या सर्व प्रकारामागे रामदास राहणे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजय सावंत व पोलिस निरीक्षक सचिन कदम यांच्या पथकाने २२ जूनला संगमनेरमधील राहणेच्या घरी छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्या घरात एक पिस्टल, दोन राऊंड आणि आणखी काही संशयास्पद वस्तू आढळल्या अाहेत. 


मुंबईच्या गोळीबारात राहणे होता सहभाग 
खंडणीविरोधी पथकाने मुसक्या आवळलेला राहणे याने दाऊद टोळीसाठी अनेक गुन्हे केले. २०११ मध्ये मुंबईतील व्यावसायिक ढोलकिया यांच्या कार्यालयावर झालेल्या गाेळीबारात त्याचा हात होता. मुंबई आणि गुजरातमध्ये त्याच्याविरोधात ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांना दाऊद टोळीच्या रडारवर असलेल्या मुंबईतील टार्गेटची माहिती मिळाली. 

बातम्या आणखी आहेत...