आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचे हाल झाल्यानंतर एएमटीबाबत निघाला तोडगा, आजपासून शहर बससेवा सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सुमारे तीन वर्षांपासून शहर बससेवा (एएमटी) चालवणाऱ्या यशवंत ऑटो ठेकेदार संस्थेचे ८० लाख रुपये महापालिकेने थकवले आहेत. सेवा देणे अवघड झाल्याने ठेकेदार संस्थेने सोमवारपासून शहर बससेवा बंद केली. दोन दिवस नगरकरांचे प्रचंड हाल झाल्यानंतर मंगळवारी या प्रश्नावर तोडगा काढून बुधवारपासून (१४ मार्च) बससेवा सुरू करण्याचे बैठकीत ठरले. 

 

एएमटी बंद पडल्याची संधी साधत बेशिस्त पॅगोरिक्षांसह खासगी प्रवासी वाहतूकदारांनी जनावरे कोंबल्याप्रमाणे क्षमतेपेक्षाही जास्त प्रवासी वाहतूक केली. तहान लागल्यानंतर झरा खोदण्याची परंपरा मनपाच्या सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाने पुन्हा एकदा तंतोतंत पाळली. बससेवा बंद झाल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यासाठी बैठकांचे गुऱ्हाळ सुरू झाले, पण नोटिसा येऊनही सत्ताधारी व प्रशासनाला विनाखंड सेवा सुरू ठेवता आली नाही, हे वास्तव समोर आले. 

 

१४ ऑगस्ट २०१४ रोजी नगरकरांच्या सेवेसाठी शहर बससेवा सुरू करण्याचा करार करण्यात आला. करारानुसार ठेकेदाराला वाहनतळ, वर्कशॉप, ऑफिस, मध्यवर्ती बसस्थानकासाठी खुली जागा उपलब्ध करून देण्याचे ठरले होते. तथापि, तीन वर्षांत मनपाने जागा उपलब्ध करून दिली नाही. आर्थिक मदतीचे दरमहा ५ लाख याप्रमाणे १६ महिन्यांचे ८० लाख रुपये थकले आहेत. वाढता खर्च व दुरुस्ती, देखभाल विचारात घेता ठेकेदार संस्थेने थकीत रकमेच्या मागणीसाठी वारंवार नोटिसा पाठवल्या. तथापि, सेवा बंद पडल्याशिवाय त्या सुरू ठेवण्यावर तोडगा काढला गेला नाही. 

 

पाणी पुरवठा योजनेचे थकलेले वीजबिल, पथदिव्यांची थकबाकी यांच्या नोटिसा वारंवार येऊनही बिले वेळेत भरली जात नाहीत. सेवा खंडित केल्यानंतर तजवीज करून काही रक्कम भरली जाते. जर तजवीज अगोदर केली, तर सेवा खंडित होणारच नाहीत. पण दुर्दैवाने तसे आतापर्यंत होताना दिसले नाही. केवळ मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याची आवई उठवली जाते. पण ही परिस्थिती का ओढावली, त्यावर काय उपाययोजना केल्या याचेही उत्तर कारभाऱ्यांनाच द्यावे लागणार आहे. 

 

शहर बससेवा बंद राहिल्याने दोन दिवस विद्यार्थ्यांसह सामान्य नगरकरांचे मोठे हाल झाले. मिळेल त्या खासगी वाहनाने, तसेच पॅगो रिक्षातून प्रवास करण्यात करावा लागला. त्यामुळे जनावराप्रमाणे क्षमतेपेक्षा जास्त धोकादायक पद्धतीने सर्रास वाहतूक करण्यात येत होती. चढ्या दराने प्रवासभाडे आकारून प्रवाशांची लूट सुरू होती. माळीवाडा बसस्थानकासमोरील रस्ता प्रवासी मिळवण्याच्या पॅगो रिक्षाचालकांच्या स्पर्धेमुळे ठप्प झाला होता. याकडे वाहतूक शाखा, उपप्रादेशिक परिवहन शाखेचेही दुर्लक्ष झाले. 

 

असा निघाला तोडगा 
विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे, तसेच नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी सेवा सुरू करण्याचे आवाहन महापौर व आयुक्तांनी केले. थकीत अनुदानापैकी महिनाभरात २५ ते ३० लाख देण्याचेही आश्वासन दिले. त्यानुसार आता बुधवारपासून सेवा सुरळीत सुरू होईल. तीन महिन्यांत नवीन १० बस घेण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे.'' धनंजय गाडे, संचालक, यशवंत ऑटो. 

 

गैरसोय टाळा... 
ठेकेदार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बससेवा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला महापौर सुरेखा कदम, आयुक्त घनशाम मंगळे, उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृहनेता गणेश कवडे, ठेकेदार संस्थेचे धनंजय गाडे आदी उपस्थित होते. कदम यांनी देय रक्कम एकरकमी देणे शक्य नाही. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीने बससेवा सुरू करण्यास संस्थेला सांगितले असल्याचे मनपाच्या पत्रकात म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...