आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेचा एक भाग म्हणून नगर-कल्याण रस्त्याला जोडणाऱ्या केडगाव ते कल्याण रस्त्यावरील लिंक रोडवर पोलिसांनी सकाळच्या वेळी वाहतूक बंद केली आहे. पोलिसांच्या या आठमुठेपणाचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. लिंक रोडवर पोलिस उभे राहून दादागिरी करत असल्याने वाहनचालकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. ही भरती प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार असल्याने वाहनचालकांचे हाल होतच राहणार आहेत.
जिल्हा पोलिस दलातर्फे शिपाई पदाच्या १६४ रिक्त जागांसाठी १२ मार्चपासून भरती सुरू झाली. सर्जेपुरा परिसरातील पोलिस कवायत मैदानावर ही प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपअधीक्षक मनीष कलवानिया, गृह विभागाचे उपअधीक्षक अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनासाठी सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या भरती प्रक्रियेसाठी एकूण १५ निरीक्षक, ११ सहायक निरीक्षक, ३० उपनिरीक्षक, तसेच २७५ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरतीची रंगीत तालिम ९ मार्चला घेण्यात आली होती. या पोलिस भरतीसाठी एकूण ३१ हजार ७३ उमेदवारांनी अर्ज केले होते. पहिल्याच दिवशी शारीरिक चाचणीसाठी १२ मार्चला पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या कालावधीत उमेदवारांना मुख्यालयात बोलावले. उमेदवारांना आत प्रवेश देऊन त्यांची तपासणी करण्यात आली.
दुपारी अनुकंपा तत्वावर अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दीड हजार ते अठराशे उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बाेलावण्यात आले आहे. भरती प्रक्रिया पहाटे पाचपासून होमगार्ड कार्यालयातून पोलिस मुख्यालयात प्रवेश, त्यानंतर त्यांची नावनोंदणी, नंतर गट तयार करुन छाती, उंचीची मोजमापे, उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी करुन ओळखपत्र दिले जाते.
शारीरिक चाचणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना १ हजार ६०० मीटर धावणे व नंतर क्रमाक्रमाने लांब उडी, गोळा फेक, पुल अप्स व शंभर मीटर धावणे अशा चाचण्या घेतल्या जात आहेत. शारीरिक चाचणी संपल्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सोळाशे मीटर धावण्याची चाचणी दरवर्षी केडगाव ते कल्याण रस्त्यावर घेतली जाते. त्यासाठी पहाटे पाच ते दुपारी बारापर्यंत हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. यंदाही तसेच केले आहे.
लिंक रोडवरील वाहतूक बंद केल्याची माहिती बहुतांश स्थानिक नागरिकांना माहितीच नाही. त्यामुळे त्यांचे निष्कारण हाल होत आहे. या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांची, वाहनचालकांची दादागिरी करत अडवणूक केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना अडचण होत आहे. या रस्त्याने वाहनचालकांसह विद्यार्थीही ये जा करतात. तसेच नोकरदार वर्गही. मात्र, अचानक या रस्त्याची वाहतूक बंद केल्याने त्यांचे हाल होत आहेत.
पोलिसांची दादागिरी
लिंक रस्त्यावर बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस वाहनचालकांना किंवा नागरिकांना कसलेही सहकार्य करत नाहीत. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना हा रस्ता पोलिस भरती प्रक्रियेसाठी अडवल्याचे माहिती नसल्याने त्यांची त्रेधा उडत आहे. पोलिस मात्र त्यांच्यावरच दादागिरी करत आहेत. दुसऱ्या रस्त्याने जाण्यास दरडावत आहेत. पो लसांच्या दादागिरीमुळे वाहनचालक व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.