आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे करा; अन्यथा चालते व्हा! जिल्हाधिकाऱ्यांचा मनपा कर्मचाऱ्यांना इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १४ वर्षांमध्ये झाली नव्हती, अशी ऐतिहासिक बैठक बुधवारी दुपारी झाली. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपा कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. उपनगर विभाग, सफाई कामगार, पाणीपुरवठा, ग्रंथालय, मंंगल कार्यालय व अमरधामातील कर्मचाऱ्यांची त्यांनी झाडाझडती घेतली. कामचुकार कामगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही त्यांनी कानउघडणी केली. केडगाव दुहेरी खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून नाव आलेल्या चौघांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. नेमलेली कामे प्रामाणिकपणे करा; अन्यथा घरी चालते व्हा, असा इशाराच जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी १० वाजता मनपा कर्मचाऱ्यांना हजेरीकरिता बोलवण्यात आले होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी समोर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेत त्यांना कामाबद्दल सूचना केल्या. बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी द्विवेदी नियोजन भवनात आले. येताच त्यांनी एकेका कर्मचाऱ्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. मनपा कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या बेशिस्तीचे दर्शन यावेळी झाले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कठोर शब्दांत सुनावले.

 

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना शिस्त नाही. बैठकीला येताना कर्मचारी ओळखपत्र व गणवेशही घालत नाही, ही बाब योग्य नाही, अशा शब्दांत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले. महापालिकेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाहून त्यांनी अतिरिक्त आयुक्त, तसेच संबंधित विभागप्रमुखांना धारेवर धरले. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त वालगुडे, सहायक आयुक्त मेहेर लहारे, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.

 

महापालिकेतील ८० टक्के कर्मचारी चांगले काम करत आहेत. २० टक्के कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेचे नाव बदनाम होत आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ रेल्वेस्टेशन असलेल्या या शहरात साफसफाई होताना दिसत नाही. त्याबद्दल अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. नेमून दिलेले सुपरवायझर कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवत नाहीत. यात सुधारणा झाली नाही, तर निश्चित सर्वांवर कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

 

कर्मचारी जास्तच
महापालिकेत भरती होण्यासाठी कर्मचाऱ्यांची परीक्षा होत नाही. अनेकांची मर्जीतून नियुक्ती झाल्याचे दिसून येते. पण कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असूनही मनपाचे काम सुरळीत चाललेले दिसत नाही. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना ठेवण्यात अर्थ नाही. अाधीच कर्मचारी अधिक आहेत. त्यामुळे ही संख्या कमी करणार आहे. जे काम करतील ते थांबतील; अन्यथा कामावरून काढले जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

 

अपेक्षा चुकीच्या नाहीत
प्रभागातील तक्रारींचे निराकरण होत नसून त्या सोडवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागरिक प्रामाणिपणे कर भरतात. त्याच्या जोरावर तुम्हाला पगार मिळतो. या मोबदल्यात तुम्ही चांगले काम करण्याची अपेक्षा नागरिक करतात. त्यात काय चुकीचे आहे? असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी केला. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. कोणाच्या दबावाला बळी पडू नका. नागरिकांना चांगली सेवा द्या, असे आवाहन त्यांनी केले.

 

मला त्यांची गरज नाही
जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान, पदाधिकारी, नगरसेवक यांच्या खासगी बंगल्यांवर मनपा कर्मचारी कामाला आहेत. मला तरी माझ्याकडे अशा कर्मचाऱ्यांची गरज नाही. इतर ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनीही आपल्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी त्वरित रुजू व्हावे, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांपर्यंत जाऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचा मानसही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी व्यक्त केला.

 

ते चौघे फरार...
केडगावात गेल्या महिन्यात झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर चार मनपा कर्मचाऱ्यांची संशयित आरोपींमध्ये नावे आली आहेत. त्यामुळे ते बैठकीला गैरहजर असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. यामध्ये एका नगरसेविकेच्या पतीचाही समावेश आहे. हे महाभाग महिन्यापासून फरार आहेत. मग त्यांच्यावर काय कारवाई केली, असा सवाल विचारल्यानंतर संबंधित प्रभाग अधिकारीही निरुत्तर झाले.

 

व्हॉट्स अॅप क्रमांक
महापालिका प्रभागात स्वच्छता झाली किंवा नाही, ही माहिती कळवण्यासाठी जिल्हाधिकारी एक व्हॉट्स अॅप क्रमांक जाहीर करणार आहेत. हा क्रमांक खास नागरिकांसाठीच असणार आहे. यातून कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन होईल. महापालिकेतील प्रभाग स्वच्छतेची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे अशी तक्रार आल्यास त्याला प्रभाग अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

 

नियुक्तीच ठाऊक नाही
तुमचा ड्रेस कुठे आहे? ओळखपत्र कुठे आहे? या प्रश्नांना काही कर्मचाऱ्यांनी कपडे फाटले असे उत्तर दिले. अमरधामात कामाला असलेला एकही कामगार उपस्थित नव्हता. काही कर्मचाऱ्यांना, तर ते कोणत्या विभागात कामाला आहेत, हेच माहिती नव्हते. अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. एका कर्मचाऱ्याने, तर मला आज समजले की, या विभागात कामाला आहे, असे उत्तर देताच नियोजन भवनात हशा पिकला.

 

नागरी सुविधा महत्त्वाच्या
शहरातील अनेक नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. पहिल्याच पावसात शहरातील बहुतेक रस्त्यांची खड्डे पडून चाळण होते, असा अनुभव आहे. पावसाचे पाणी साचून खड्डे अधिकच रूंदावतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांची डागडुजी करण्यात यावी, अशी नागरिकांनी मागणी आहे. शहर बससेवेची अवस्था केविलवाणी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...