आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट : आठ दिवसांनंतर पहिलीच्या मुलांना केले पुस्तकांचे वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोधेगाव- जिल्हा परिषद शाळा सुरु होऊन तब्बल आठ दिवसांनंतर पहिलीतील मुलांना पुस्तकांचे पूर्ण वाटप करण्यात आले. पहिल्याच दिवशी दुसरी ते आठवीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. मात्र, पहिलीच्या मुलांना तालुक्यात कोठेही पुस्तके वितरीत करण्यात आली नसल्याची बाब 'दिव्य मराठी'ने समोर आणली होती. शिक्षण विभागाने त्याची दखल घेत ही पुस्तके शाळांना वितरित केली. हातात पुस्तके पडताच चिमुकले हरखून गेले. 


जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीतील सर्व मुलांना (खासगी विनाअनुदानित शाळा वगळून) शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. पहिल्या दिवशी दुसरी ते आठवीच्या मुलांना शाळेत मोफत पाठ्यपुस्तके दिली जात असताना पहिल्याच्या मुलांना मात्र यंदा नवीन अभ्यास्क्रमामुळे पाठ्यपुस्तके देण्यात आली नव्हती. शाळेलाच या इयत्तेची पुस्तके वितरित करण्यात आली नव्हती. आपल्या बरोबरच्या दुसऱ्या इयत्तेतील मुलांना पाठ्यपुस्तके दिली जात असताना आपल्याला मात्र मिळू शकली नसल्याने मुले हिरमुसले होते. 


पहिल्या दिवशी बोधेगाव व बालमटाकळी केंद्रातील अनुक्रमे १९२ व १७३ मुले पुस्तकांपासून वंचित राहिली. याबाबत 'दिव्य मराठी'ने १६ जूनला वृत्त दिल्यानंतर शिक्षण विभागाने पहिलीच्या सर्व विषयाच्या पुस्तकांचे शाळानिहाय वाटप केले. इतरही काही इयत्तेच्या मुलांना काही विषयांची पुस्तके आलेली नव्हती. ती पुस्तकेही वितरित करण्यात आली. पुस्तके हातात पडताच चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 


गणवेशाचे अनुदान अद्याप नाही 
अनुसूचित जाती-जमाती, बीपीएल संवर्गातील मुले आणि सर्व मुलींना मोफत गणवेश दिला जातो (खासगी शाळा वगळून). प्रत्येकी दोन गणवेशांसाठी पालकांच्या खात्यावर थेट रक्कम वर्ग केली जाते. शाळा सुरु होऊन दहा दिवस झाले, तरी अद्याप पालकांच्या खात्यावर रक्कम वर्ग न करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केलेला नाही. शासनाने लवकरात लवकर रक्कम वर्ग करावी,अशी मागणी पालकांकडून होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...