आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले पळवणाऱ्या टोळीच्या अफवेला बळी पडून कलाकाराला केली बेदम मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारहाण झालेला कलावंत आबा ऊर्फ राजश्री शिंदे. - Divya Marathi
मारहाण झालेला कलावंत आबा ऊर्फ राजश्री शिंदे.

संगमनेर- मुले पळवणाऱ्या टोळीविषयी सोशल मीडियावरील अफवांमुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयावरून एका कलावंताला बेदम मारहाणीचा सामना करावा लागला. 


आझादनगरमध्ये राहणाऱ्या आबा ऊर्फ राजू ऊर्फ राजश्री शिंदे या हरहुन्नरी कलाकारावर समनापूरमध्ये हा प्रसंग गुदरला. आबा नृत्यनिपुण कलाकार आहे. फडाची, बैठकीची लावणी व सध्या प्रसिध्द असलेल्या हिंदी-मराठी गाण्यांवर दिलखेचक नृत्याच्या कलेमुळे त्याला विविध तमाशा फडांकडून मागणी असते. तमाशाचा सिझन संपला की, तो गावांमध्ये, आठवडे बाजारात स्त्रीरुप धारण करून भिक्षा मागतो. 


आघाडीच्या काळू बाळू, दत्तोबा तांबे, आम्रपाली पुणेकर, मंगला सातारकर, निवृत्ती गायकवाड, विजय धुळेकर, बाळूबाई यांच्या तमाशात त्याने नाच्या व नृत्यांगणेची कला पेश केली आहे. लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही पाहिल्याबरोबर स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या आबाने पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून नृत्यकलेचा स्वीकार केला. लोकांचे मनोरंजन करत मिळालेल्या पैशांवर कुटुंबाला त्याने हातभार लावला. 


कधी पंजाबी ड्रेस, तर कधी साडी नेसून आबा भिक्षा मागतो. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मुले पळवणारी टोळी अाल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. याचा फटका रविवारी भिक्षा मागण्यासाठी समनापूरला गेलेल्या आबाला बसला. पंजाबी ड्रेसमध्ये गेलेल्या आबाने चार-पाच घरी भिक्षा मागितल्यानंतर एका महाभागाने तो पोरं पळवण्यासाठी आलाय, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. गर्दीने हात धुवून घेतला. त्याचे कपडे फाडले. काही युवकांनी मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल केला. स्वतःची ओळख पटवून देण्याची संधीही त्याला कोणी दिली नाही. त्याच्याकडे असलेले आधार कार्ड, स्त्रीवेशातील फोटो पाहण्याची फुरसद मर्दुमकी दाखवणाऱ्या गर्दीला नव्हती. मार नंतर त्याला ओळखणारे कोणीतरी आले. तोपर्यंत संगमनेर शहर पोलिस आल्याने त्याची सुटका झाली. पण गेल्या २० वर्षांत न घडलेली ही घटना आबाचं भावविश्व उद््ध्वस्त करून गेली. त्याला बसलेला धक्का त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. मी चोर, भामटा नाही, कलाकार आहे, असे कळवळून सांगणाऱ्या आबाला अश्रू अनावर झाले होते. 


सत्यता पडताळून पाहणे आवश्यक 
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी कोणत्याही घटनेतील सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे. जमावाच्या हातून खुनासारखा गंभीर गुन्हा घडल्याचे औरंगाबादच्या घटनेत समोर आले आहे. पोटापाण्याचा व्यवसाय करणाऱ्या कलाकारांनी गावात भिक्षा मागण्यापूर्वी याची पूर्वकल्पना गावातील जबाबदार व्यक्ती किंवा पोलिस पाटील यांना दिल्यास अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल.
- सुनील पाटील, प्रभारी पोलिस निरीक्षक, संगमनेर शहर. 

बातम्या आणखी आहेत...