आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोपानकाकांनी देवस्थानच्या नावाने दिंडी काढल्यास आत्मदहन; अशोक सावंत यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निघोज- पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय देवस्थानापासून निघणाऱ्या सोपानकाका औटी यांच्या नेतृत्वाखालील आषाढी दिंडीस संत निळोबाराय संस्थानने परवानगी नाकारली अाहे. त्यांनी आमच्या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे, अन्यथा निळोबाराय यांच्या नावाने दिंडी काढू नये, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. तसे न केल्यास आत्मदहनाचा इशारा देवस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला. 


महाराष्ट्रातील प्रमुख पाच संतांपैकी संत परंपरेतील शेवटचे संत म्हणून ओळख असलेल्या संत निळोबारांचे संजीवन समाधी स्थळ पिंपळनेर येथे आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या धर्तीवर पिंपळनेर येथून गेल्या वर्षीपासून पालखी सोहळा सुरू करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्याच वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगर व पुणे जिल्ह्यातील अनेक दिंड्या या पालखी सोहळयात सहभागी झाल्या. आषाढी वारीच्या सरकारी नियोजनात पिंपळनेर देवस्थान समाविष्ट करण्यात आले आहे. पंढरपूर देवस्थान समितीनेही निळोबांच्या पालखी सोहळ्यास मान्यता दिली आहे. 


गेल्यावर्षी सोहळयाचे नियोजन करताना औटी यांनी बैठकीत सहभाग घेतला. मात्र, ते सोहळ्यात सहभागी झाले नाहीत. त्यांनी स्वतंत्र दिंडी काढली. तालुक्यातील वारकरी एकत्र येत असताना त्यांनी वेगळी दिंडी काढू नये, अशी देवस्थानसह पिंपळनेर ग्रामस्थांची भावना आहे. 


संस्थानचा प्रस्ताव नाकारत औटी यांनी पंढरपूर येथील सेवा आश्रमाच्या मदतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. औटी यांनी देवस्थानमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केल्याचे संस्थानचे म्हणणे आहे. देवस्थान विश्वस्तांच्या बैठकीत संत निळोबाराय संस्थानशिवाय इतर कोणीही संत निळोबारायांच्या नावाने दिंडी, पालखी सोहळा काढता येणार नाही, असा ठराव करण्यात आला आहे. 


दिंडी सोहळ्याची रितसर नोंदणी 
दिंडी सोहळ्याची आयुक्तांकडे नोंदणी केली की, सर्व आर्थिक व्यवहाराचे ऑडिट करावे लागणार आहे. नेमके हेच काही महाराजांना नको आहे. म्हणून ते आमच्या दिंडी सोहळ्यात सहभागी होत नाहीत.
- अशोक सावंत, कार्याध्यक्ष, पिंपळनेर देवस्थान, तालुका पारनेर, जिल्हा नगर. 

बातम्या आणखी आहेत...