आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवर्धनामुळे कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वर्षभरात शेकरूंची संख्या पाचपटीने वाढली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले  - कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात राज्य प्राणी असलेल्या शेकरूंची संख्या वर्षभरात पाचपट वाढल्याचे दिसून आले आहे. इतरत्र मात्र झपाट्याने दुर्मिळ होत चाललेल्या या प्राण्याची संख्या वाढणे हे सुचिन्ह मानले जात आहे. वन विभागाने त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी कठोरपणे राबवलेल्या उपाययोजनांचे हे यश असल्याची माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली. भीमाशंकर अभयारण्यानंतर आता कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यही शेकरूंसाठी महत्त्वाचा अधिवास ठरले आहे. विशेषत: या अभयारण्यातील आजोबा डोंगररांगांमधील जंगलात शेकरूंची संख्या मोठी वाढली आहे.  


अकोलेतील ३२ आदिवासी गावांचा परिसर व्यापलेल्या या अभयारण्यात गतवर्षीपेक्षा पाचपटीने शेकरू वाढल्याचे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले. नाशिक येथील वन्यजीव विभागाकडून ही शिरगणती करण्यात आली. या  अभयारण्यात शेकरूंची ५९९ घरटी आढळून आली. मात्र, घरट्यांच्या संख्येपेक्षा शेकरूंची संख्या कमी असते. कारण शेकरू शत्रूला चकवण्यासाठी अनेक ठिकाणी घरटे करते.  तरीही ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचपट आहे. गेल्या वर्षी ही संख्या २९ च्या दरम्यान होती. या वर्षी ती पाचपट म्हणजे १५६ नोंदवण्यात आली आहे. अभयारण्यातील आजोबाचा डोंगर परिसरात वापरातील व वापरात नसलेली ५९९ घरटी आढळली. या भागात १३९ शेकरूंची नोंद झाली आहे, तर कळसूबाई-घाटघर परिसरात १७ शेकरू नोंदवण्यात आले. तेथेही ४३ घरटी आढळली.    
ही गणती जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे वनक्षेत्रपाल अमोल आडे यांनी सांगितले. 

 

असे असते शेकरू  

शेकरू (जायंट स्क्विरल) हा दोन ते अडीच किलो वजनाचा आणि अडीच ते तीन फूट लांबीचा खारीच्या वर्गातील प्राणी आहे. त्याचे डोळे गुंजीसारखे लाल असतात. त्याचे शेपूट झुबकेदार व लांब असते. शेकरू वर्षातून एकदाच म्हणजे साधारण डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत पिल्लाला जन्माला घालते. विविध फळे व फुलातील मध हे त्यांचे खाद्य आहे.  

 

राज्यात येथे आढळते शेकरू  

सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील भीमाशंकर अभयारण्य, चांदोली अभयारण्य, माहुली, वासोटा, मेळघाट, गडचिरोली जंगलातील काही भाग, तसेच कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य या भागात शेकरू आढळते. त्यांना झाडांच्या फांद्या एकमेकांत अडकून तयार झालेले सलग जंगल लागते. ही सलगता कमी झाल्यास हा प्राणी संकटात येतो.  

 

भार कमी केल्याचा परिणाम  

^अभयारण्य क्षेत्रात सर्व २४ गावांत ग्राम परिस्थितीकीय समित्या स्थापन केल्या. सर्व गावांत ९० टक्के घरांत गॅसचे वाटप केले. त्यांना दोन सिलिंडरचे कनेक्शन दिले. त्यामुळे जंगलावरचा त्यांचा भार कमी झाला.
शिवाजी ठाकरे, सहायक वनसंरक्षक, कळसूबाई-हरिश्चंद्रगड

 

बातम्या आणखी आहेत...