आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा धरण 80 टक्के भरले; घाटघरला 165, तर रतनवाडीत 161 मिमी पाऊस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - कुमशेत, पाचनई, पेठाची वाडी, अंबित परिसरात सुरू असलेल्या पावसाची तीव्रता बुधवारी कमी झाली. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या जाहगीरदरावाडी, बारी, वारंघुशी, घाटघर व रतनवाडी परिसरात पावसाने प्रमाण तुलनेत कमी झाले आहे. पाणलोट क्षेत्रात तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक चांगली सुरू आहे. बुधवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत पाणीसाठा ८५८७ दलघफू (७७.७८ टक्के ) झाला होता. सायंकाळी साठा ८० टक्क्यांपेक्षा जास्त झाला.

 

घाटघरला १६५ व रतनवाडीत १६१ मिलिमीटर पाऊस झाला. पांजरे व भंडारदरा धरण परिसरात सुमारे ६ ते ८ इंच पाऊस झाला. सोमवारी व मंगळवारी रतनवाडी, घाटघर परिसरात १३ ते १४ इंच पाऊस पडला होता. त्यामुळे आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत पांजरे १४८, भंडारदरा १६०, निळवंडे ३३, आढळा ७, वाकी १६२, अकोले २६, तर कोतूळ येथे ५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. निळवंडे धरणातील साठा २४२२ दलघफू (२९.११ टक्के) पोहोचला.

 

भंडारदरा धरणात २४ तासांत तब्बल ८२८ दलघफू व या पावसाळ्यात ७९७५ दलघफू नव्याने पाणी आले. निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची अशीच परिस्थिती असून धरणसाठ्यात २४ तासात नव्याने ३९७ दलघफू या पावसाळ्यात ३९१० दलघफू नवीन पाणी आले. बुधवारी दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात २४ तासात तब्बल १२२५ दलघफू पाण्याची नव्याने वाढ झाली. अकोले तालुक्यात कोतूळ येथे मुळानदी ८४७३ क्युसेकने वाहत आहे. राहुरी येथील मुळा (ज्ञानेश्वरसागर) धरणात बुधवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासात ११ हजार २१ दलघफू, तर या पावसाळ्यात ६५०९ दलघफू नविन पाणी आले.

 

बातम्या आणखी आहेत...