आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांच्या सुविधेसाठी 'एसपी' राबवणार नवीन संपर्क क्रमांकाचा 'बिहार पॅटर्न'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी नागरिकांकडे परमनंट मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे. नागरिकांची ही गरज ओळखत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नवीन संपर्क क्रमांकाचा 'बिहार पॅटर्न' नगरमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन येणारा अधिकारी बदली झालेल्या अधिकाऱ्याचा जुनाच मोबाइल क्रमांक वापरणार आहे. त्यामुळे नागरिकांना पोलिसांशी सहज संपर्क साधता येईल. येत्या आठ दिवसांत सर्व पोलिस अधिकाऱ्यांना नवीन मोबाइल क्रमांक देण्यात येणार असून हे क्रमांक नागरिकांच्या सुविधेसाठी जाहीर करण्यात येणार आहेत. 


पोलिस अधीक्षक असो, की एखाद्या पोलिस ठाण्यातील निरीक्षक, त्यांची बदली झाल्यानंतर नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याने जुन्या अधिकाऱ्याचाच मोबाइल क्रमांक वापरणे बिहार राज्यातील पोलिसांसाठी बंधनकारक आहे. नागरिकांसाठी सोयीचा व गरजेचा असलेला हा 'बिहार पॅटर्न' नगरमध्येही राबवण्यात येणार आहे. नागरिकांना पोलिसांशी सहज संपर्क साधता आला पाहिजे, याच उद्देशाने पोलिस अधीक्षक शर्मा हा पॅटर्न राबवत आहेत. नागरिकांकडे पोलिस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक असतो, मात्र कधी कधी ही सेवा २४ तास उपलब्ध होऊ शकत नाही. पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाचा संपर्क क्रमांक असला, तरी या अधिकाऱ्यांच्या नेहमी बदल्या होत राहतात. त्यामुळे अडचणीच्या वेळी नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधणे कठिण होते. आता मात्र नागरिकांना प्रत्येक पोलिस ठाण्यातील निरीक्षकांचा परमनंट मोबाइल क्रमांक देण्यात येणार आहे. निरीक्षकाची बदली झाली, तरी नवीन येणारा निरीक्षक बदली होऊन गेलेल्या निरीक्षकाचाच मोबाइल क्रमांक वापरणार आहे. 


निरीक्षकांप्रमाणेच पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सहायक पोलिस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक, नियंत्रण व वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना देखील हे मोबाइल क्रमांक देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणताही पोलिस अधिकारी बदलला, तरी त्या पदावर काम करणाऱ्या नव्या अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक एकच राहणार आहे. बिहार राज्यात मागील दहा वर्षांपासून ही पध्दत अवलंबली जात आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याशी तातडीने व सहज संपर्क साधता येतो. नगरकरांसाठीदेखील येत्या आठ दिवसांत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नगरकर व पोलिस अधिकाऱ्यांचे संबंध अधिक घट्ट होण्यास मदत होणार अाहेत. 


नगरकरांसाठी सुविधा 
नागरिकांची सुरक्षा हे पोलिसांचे कर्तव्य आहे. परंतु अनेक वेळा अडचणीत असताना नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधता येत नाही. नागरिकांना अडचणीच्या वेळी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याशी सहज संपर्क साधता यावा, यासाठी नवीन संपर्क क्रमांक देण्यात येणार आहेत. हे सर्व संपर्क क्रमांक परमनंट राहणार आहेत. अधिकारी बदलून गेले, तरी नागरिकांच्या सोयीसाठी जाहीर करण्यात आलेले संपर्क क्रमांक तेच राहणार आहेत.
- रंजनकुमार शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक. 


२४ तास सुरू संपर्क क्रमांक 
बहुतेक वेळा नागरिकांना पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा असतो. तथापि, अधिकारी बाहेर गेले असतील, तर पोलिस ठाण्यातील दूरध्वनी क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधण्यास अडचण येते. मात्र, आता नगर जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील नागरिक या अधिकाऱ्यांशी २४ तासांत केव्हाही सहज संपर्क साधू शकतील. 

बातम्या आणखी आहेत...