Home »Maharashtra »Western Maharashtra »Ahmednagar» BJP MLA Kardile Custody Extended By 2 Days

भाजप आमदार कर्डिले यांच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ, आणखी सहा जण अटकेत

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली

प्रतिनिधी | Apr 11, 2018, 05:10 AM IST

नगर -पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. साेमवारी न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी संपताच त्यांना मंगळवारी पुन्हा हजर करण्यात आले हाेते. पोलिसांनी कर्डिलेंवरील गुन्ह्यात भादंवि ३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढवल्याने कर्डिले यांना जामीन मिळू शकला नाही. दरम्यान, तोडफोड करणाऱ्या २२ जणांचीही पोलिस कोठडी मंगळवारी संपली. न्यायालयाने त्यांची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.


केडगाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी शनिवारी (७ एप्रिल) रात्री १० च्या सुमारास शहराचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलावले. या वेळी त्यांच्या दोनशे ते अडीचशे समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली हाेती. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले घटनास्थळी उपस्थित होते. याप्रकरणी कर्डिलेंसह २५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. कर्डिले सोमवारी सकाळी कॅम्प पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाले हाेते. मंगळवारी कर्डिलेंना जामीन न मिळू शकल्याने त्यांच्या समर्थकांचा हिरमाेड झाला. पोलिसांनी सुरुवातीला त्यांच्यावर भादंवि ३३३ हे कलम (कर्तव्य बजावत असलेल्या लोकसेवकास इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे) लावले होते.

परंतु वैद्यकीय अहवालात काही पाेलिस कर्मचाऱ्यास किरकोळ जखमा झाल्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी भादंवि ३३३ हे कलम वगळून भादंवि ३३२ हे कलम लावले. दरम्यान, कर्डिले यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यापूर्वी पोलिसांनी भादंवि ३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढवले. त्यामुळे कर्डिले यांना जामीन मिळू शकला नाही. दरम्यान, केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले आमदार संग्राम जगताप यांना गुरुवारी (१२ एप्रिल) पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आणखी सहा जण अटकेत
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस आणखी ६ जणांना मंगळवारी अटक केली. नगरसेवक फैयाज शेख, संजय गाडे, धनंजय गाडे, अंकुश मोहिते, सय्यद ख्वाजा उर्फ इंजा चिच्ची, अवधूत जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड, पोलिस नाईक राजू सुद्रीक यांनी ही कारवाई केली. आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तोडफोड प्रकरणात आतापर्यंत ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पुढील स्‍लाइडवर, कर्डिलेंना पुन्हा अटक हाेण्याची शक्यता...

हेही वाचा,
आमदार कर्डिलेंची हकालपट्टी करा; शिवसेना आक्रमक, मुख्‍यमंत्र्याचा मात्र सबुरीचा सल्‍ला

Next Article

Recommended