आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असून त्याचा आलेख कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहे. लुटमार व चोरीच्या घटनांमुळे नगर शहर असुरक्षित बनले आहे. पोलीसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत, त्यामुळे नागरिकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. चोरीच्या घटनांना आळा घालून शहरातील नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 


नगर शहरात सावेडी, कापडबाजार, केडगाव, मार्केटयार्ड व इतर असा कोणताही भाग नसेल की, त्या भागात चोरांची दहशत नाही. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडणे, पाळत ठेवून हातात असलेली पैशांची बॅग जबरदस्ती पळवणे, रात्रीच्या वेळी धारदार शस्त्राचा धाक दाखवून नागरिकांच्या गळ्यातील चैन, मोबाइल, पर्स लुटून पळून जाणे, त्याचप्रमाणे शहरात दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या चोरीचे प्रमाण देखील वाढत चाललेले आहे. रात्रीच्या वेळी चोरी, घरफोडी व दरोड्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या घटनांमुळे नगर शहर असुरक्षित बनले आहे. भाजप वकील आघाडी व राऊ युवा प्रतिष्ठानच्या वतीने मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात स्वखर्चाने कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे या परिसरात चोरीच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. यासाठी शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. पोलीसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षितेचा प्रश्न निमाण झालेला आहे. शहरातील व्यापारी, महिला, जेष्ठ वर्ग, व्यावसायिक, पत्रकार यांच्या सुरक्षतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या घटनांना आळा घालून नागरिकांच्या मनात सुरक्षतेची भावना निर्माण करावी, अशी मागणी भाजप आघाडीने केली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. राहुल रासकर, अविनाश साखला, संदीप पवार, नितीन जोशी, सुजित खरमाळे, जालिंदर शिंदे, अभिषेक शिंदे, अॅड.भारत रासकर, निखिल सोनवणे आदी उपस्थित होते. 


बंद पोलिस चौक्या सुरू करा 
नगर शहरात कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत चितळरोड, मार्केटयार्ड, बंगाल चौकी, रेल्वे स्टेशन, बुरुडगाव रोड, केडगाव, गंजबाजार, कापडबाजार या ठिकाणी असलेल्या पोलीस चौक्या बंद आहेत. तसेच तोफखाना पोलीस ठाण्यांतर्गत मंगलगेट, सावेडी, गुलमोहर रोड यापैकी मंगलगेट व सावेडी येथे दोनच पोलीस चौक्या कार्यरत आहे. बंद पडलेल्या पोलिस चौक्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी आघाडीच्या वतीने करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...