आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेचार दशके रुग्णसेवाला वाहिलेले रसिक व्यक्तिमत्त्व हरपले; हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निसळ यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- 'जोपर्यंत माझे हात-पाय चालत आहेत, तोपर्यंत रुग्णसेवेचे व्रत मी चालूच ठेवणार आहे', असे सांगणारे नगर शहरातील जुन्या पिढीतील नामवंत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जयंत श्रीकृष्ण निसळ अखेरपर्यंत एखाद्या तरुणाच्या उत्साहात समाजजीवन व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहिले. इतिहास, साहित्य, छायाचित्रण, संगीत, नाट्य असे विविध छंद जोपासणारे डॉ. निसळ यांच्या निधनाने शहरातील एक महत्त्वाचा दुवा बुधवारी निखळला. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी डॉ. शैला, मुलगा डॉ. कौस्तुभ (इंग्लंड), सून डॉ. मयुरा, कन्या डॉ. प्राची केदार आठवले, जावई, नातवंडे, भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे. 


अचूक निदानाबद्दल डॉ. निसळ यांची ख्याती होती. शहरातील अनेकांचे ते 'फॅमिली डॉक्टर' होते. शहरातील दिल्लीगेट परिसरातील शमी गणपती ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. इंडियन मेडिकल असाेसिएशनचे संस्थापक, अएसो सोसायटी हायस्कूलच्या नियामक मंडळाचे ते सदस्य होते. 
निसळ घराणे मूळचे खुल्दाबादचे. अल्लाउद्दिन खिलजीच्या स्वारीनंतर हे कुटुंब नगर जिल्ह्यातील मांडवगणला स्थायिक झालं. जयंत यांचे वडील डॉ. श्रीकृष्ण निसळ यांनी १९३७ मध्ये भिंगारला गोरगरिबांसाठी पहिला दवाखाना सुरू केला. १९५४-५५ मध्ये नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. १९६७-७२ दरम्यान ते आमदार होते. जयंत यांनी पुण्याला बीजे मेडिकलमध्ये शिक्षण घेतलं. जब्बार पटेल, अनिल अवचट, पद्मसिंह पाटील, मोहन आगाशे, जयंत करंदीकर हेही तेव्हा बीजेला होते. एमडी करताना डॉ. जयंत यांना डॉ. ग्रांट, डॉ. वाडिया यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. १९७४ ला नगरमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. तेव्हा शहरात मोजकेच डॉक्टर होते. प्रारंभी डॉ. निसळ यांनी आयुर्वेदमध्ये सेवा दिली. १९८२ मध्ये त्यांनी स्वत:चे रुग्णालय सुरू केले. 


साडेचार दशकं डॉ. निसळ यांनी नगरकरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केले. नगरच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाशी ते एकरूप झाले होते. संतकवी दासगणू, अवतार मेहेरबाबा, राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी, क्षीरसागर महाराजांना मला पाहता आलं, यातील काहींची सेवा करता आली, हे माझे भाग्य आहे, असं ते म्हणत. 


डॉ. निसळ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. दुपारी अडीच वाजता त्यांचे पार्थिव नगर येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी वैद्यकीय व्यावसायिक, तसेच सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी गर्दी केली होती. 


संध्याकाळी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी बोलताना डॉ. रवींद्र साताळकर, डॉ. रवींद्र सोमाणी, श्रीराम तांबोळी, किशोर मुनोत, दीपक पापडेजा, डॉ. पांडुरंग डौले आदींनी डॉ. निसळ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 


'हेरिटेज वॉक'मध्ये सहभाग 
'स्वागत अहमदनगर'च्या काही हेिरटेज वॉकमध्ये डॉ. निसळ दाम्पत्य सहभागी झाले होते. नगर शहरातील डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांना नगर शहराचा इतिहास समजावा, म्हणून त्यांनी खास डॉक्टरांसाठी भुईकोट किल्ला, दमडी मशीद, फराहबख्क्ष महाल व डोंगरगणची सहल आयोजित केली होती. मागील वर्षी अमृत महोत्सवानिमित्त डॉ. निसळ यांनी दैनिक दिव्य मराठीशी दिलखुलास संवादही साधला होता.

बातम्या आणखी आहेत...