आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिशिंगणापूरमध्ये फटाके फोडून पेढे वाटत जल्लोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे- श्रीशनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम २०१८ कायदा मंजूर झाल्यानंतर शनिशिंगणापूरमध्ये गावकऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी व भाजप, सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 


शिंगणापूर हे घराला दार नसलेले गाव म्हणून प्रसिद्ध आहे. शनैश्वर ही न्यायाची देवता मानली जाते. शासनाने हे देवस्थान ताब्यात घेण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर विद्यमान विश्वस्त मंडळाला नाकारत गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. शासनाचा निर्णय मान्य करताना शिंगणापूरच काय, पण नेवासे तालुका किंवा नगर जिल्ह्यातून एकही विरोधी अर्ज किंवा तक्रार आली नव्हती. यादृष्टीनेही शिंगणापूर आगळेवेगळे गाव ठरले. 
शनैश्वर देवस्थानचे शेवटचे विश्वस्त मंडळ वादग्रस्त ठरले. 


गावकरी विरुद्ध विश्वस्त मंडळ अशी लढाई गेले १० दिवस चालू होती. बेकायदेशीर नोकरभरती प्रकरणातून उपोषणे, आरोप, प्रत्यारोप झाले. गावकऱ्यांच्या रेट्यापुढे विश्वस्त मंडळाला माघार घ्यावी लागली. उपोषणार्थीना सर्व कागदपत्रे दिली गेली. ज्या दिवशी उपोषण संपले, त्याच दिवशी विधिमंडळात शनैश्वर देवस्थानचा विश्वस्त अधिनियम मंजूर झाला. लगेचच विधान परिषदेने मंजुरी दिल्यानंतर विश्वस्त मंडळ बरखास्त झाले. मध्यरात्री सोशल मीडियाद्वारे संपूर्ण तालुक्यात ही बातमी फिरली. सकाळी शनिभक्त मंडळ, गावकरी, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिंगणापूरला जमले. फटाके फोडून, पेढे वाटून शनी महाराजांना सामुदायिक अभिषेक करण्यात आला. 


यावेळी भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, डॉ. वैभव शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर, बापूसाहेब शेटे, प्रकाश शेटे उपस्थित होते. अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधी व न्यायमंत्री रणजीत पाटील यांचे आभार मानणारे संदेश पाठवले. विश्वस्त मंडळातील पदाधिकारी मात्र देवस्थानकडे फिरकले नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...