आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेर शहरातील कचऱ्याचे ‘स्वच्छता अॅप’द्वारे निर्मूलन; असा करा अॅपचा उपयोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संगमनेरने सहभाग घेतला आहे. शहर स्वच्छतेचा नारा देणाऱ्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे यावर्षी शहर विकासासाठी स्वच्छतेचे बक्षीस मिळवायचेच, यासाठी पायाला भिंगरी बांधल्यागत काम करत आहेत. गटारे तुंबली, कचऱ्याचे ढिगारे साचले, घंटागाडी आली नाही यासंदर्भात ऑनलाइन तक्रारी करताना त्याचे फोटो ‘स्वच्छता अॅप’वर अपलोड करताच स्वच्छता विभागाचे कर्मचारी दखल घेतात. 


नगराध्यक्ष तांबे यांनी शहर स्वच्छतेसाठी प्रथमपासून प्राधान्य दिले. संधी मिळेल तेथे स्वच्छतेविषयी त्या प्रबोधन करत असतात. आता केंद्र शासनाने स्वच्छ शहरांसाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे. शहर स्वच्छतेसाठी वेगवेगळे उपाय केले जात असले, तरी अनेक भागातील समस्या सुटत नाही, पालिकेचे कर्मचारी तेथे पोहोचू शकत नाहीत. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी शासकीय ‘स्वच्छता अॅप’ विकसित करण्यात आले. या अॅपवर तक्रार दाखल होताच ती संबंधित नगरपालिकेच्या वेबसाईटवर दिसेल आणि स्वच्छता कर्मचारी तिचे निरसन करतील. याशिवाय आपली तक्रार निरसन झाल्याचाही संदेश संबंधित व्यक्तीला देतील. 


नगराध्यक्ष तांबे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग यांच्यासोबत मुख्याधिकारी सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल आणि पालिकेच्या सर्वच विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती यासाठी झोकून देऊन काम करत आहेत. नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड करून स्वच्छतेसंबंधीच्या तक्रारी त्यावर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर विभागनिहाय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अॅपवर नागरिकांनी आपल्या भागातील कचरा, गटारीचे फोटो टाकताना ते कोठले आहेत हे स्पष्ट करायचे आहे. त्यासाठी चकरा मारण्याची आवश्यकता नाही. 


शहर ६९ क्रमांकावर 
स्वच्छ, सुंदर हरित संगमनेर ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी प्रबोधन सुरू आहे. यासाठी अॅपचा हातभार लागेल. शाळा, महाविद्यालयांतून प्रबोधन करून हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत. दोन दिवसांपूर्वी आपला क्रमांक १९४ वा होता, तो ६९ वर आला आहे. प्रथम येण्याचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू आहे.
- दुर्गातांबे, नगराध्यक्ष. 


हजारांवर डाऊनलोड 
स्वच्छसर्वेक्षण२०१८ मध्ये देशभरातून ४०४१ शहरांनी सहभाग नोंदवला आहे. स्वच्छता अॅप आतापर्यंत हजार १०० पेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केले असून त्यावर तक्रारी येत आहेत. या तक्रारींचे बारा तासांच्या आत स्वच्छता कर्मचारी पाठवून निरसन केले जात आहे. संगमनेरातील प्रत्येक व्यक्तीने हे अॅप डाऊनलोड करावे ही अपेक्षा आहे. 
- पूजा शिंदे, समन्वयक. 

 

प्ले स्टोअरवर ‘Swachhata-Mohua’हे अॅप डाऊनलोड करून मोबाइल क्रमांक नोंदवत इन्स्टाॅल करता येईल. या अॅपवर नागरिकांना परिसरातील अस्वच्छतेसंदर्भात ऑनलाइन तक्रार करता येईल. अस्वच्छतेबाबतचे फोटो अॅपवर अपलोड केले जातील. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी अॅडमीन लॉगीन असेल. त्याद्वारे ‘इंजिनिअर्स अॅप’ला हे अॅप कनेक्ट असून त्यात फक्त नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी आहेत. आलेल्या तक्रारी आेपन करून त्यांचे विभागनिहाय नियोजन करत नेमलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकरवी त्या परिसरात स्वच्छता केली जाईल. केलेल्या कार्यवाहीचे फाेटो स्वच्छता अॅपवर टाकून तक्रार निकाली काढली जाईल, असे सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...