आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वर्षीच्या तुलनेत नगर जिल्ह्यात यावर्षी १६ टक्के कमी पाऊस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुरुवार (१४ जून) पर्यंत केवळ ८.७७ टक्केच पाऊस झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी १४ जूनपर्यंतच्या तुलनेत यंदा १४ जूनपर्यंत १६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याचा पंधरवडा उलटून देखील समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. 


नगर जिल्ह्यात १ व २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. गेल्या बारा दिवसांपासून जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामाची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. हवामान विभागाने यंदा दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे नगर जिल्ह्यात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीपूर्व मशागती सुरू केल्या होत्या. खरिपाच्या पेरण्यासाठी शेतकरी वर्ग सज्ज झाला असताना पावसाने मात्र पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी १ जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती. १ ते १५ जूनपर्यंत जिल्ह्यात २५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला होता. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच दीड लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. १५ जूननंतर तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता. 


जुलै महिना मात्र कोरडा गेला होता, तरी देखील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या.ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाला दमदार सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात सर्वच तालुक्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे खरिपाच्या साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. गेल्या वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत सहा लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला होता. चांगल्या पावसामुळे गेल्या वर्षी रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढले होते. यंदा चांगल्या पावसाच्या अपेक्षेने खरिपाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. यंदा कृषी विभागाने ५ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात खरिपाच्या पेरणीपूर्व मशागती पूर्ण झाल्या होत्या. यंदा जून १ व २ जूनला तुरळक पाऊस झाला.त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी िदली. जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला, तरी देखील नऊ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला नाही. सर्वाधिक पावसाची नोंद होत असलेल्या अकोले तालुक्यात यंदा पंधरा दिवसांत ५.४७ टक्केच पाऊस झाला असून, गेल्या वर्षी या तालुक्यात ६.२८ टक्के पाऊस झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत जामखेड तालुक्यात सर्वाधिक २१. २५ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षी या तालुक्यात २४.१५ टक्के पाऊस झाला होता. गेल्या वर्षी अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, पाथर्डी हे तालुके वगळता अन्य सर्वच तालुक्यांत २० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला होता. यंदा राहाता, श्रीगोंदे व राहुरी या तालुक्यांत ४ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला नाही. पारनेर तालुक्यात ६.९६ टक्के, संगमनेर १६ टक्के, श्रीरामपूर ८ टक्के, कोपरगाव १० टक्के, नगर ७.४४ टक्के व शेवगाव १४.२१ टक्के पाऊस झाला अाहे. पावसाने हुलकावणी दिल्याने ग्रामीण भागात पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पावसा अभावी सर्वच कृषी सेवा केंद्रावर शुकशुकाट पहायला दिसत आहे. 


मुळा धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव 
पावसाने आेढ दिल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. २६ हजार दक्ष लक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या मुळा धरणात गेल्या वर्षी १४ जूनपर्यंत १८.६६ टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र, पावसाने आेढ देऊनही पाणीसाठ्यात जास्त फरक पडला नाही. यंदा १४ जूनपर्यंत मुळा धरणात १८.४८ टक्के पाणीसाठा आहे. या धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...