आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
धर्मवीर अण्णाभाऊ लष्कारे युवा प्रतिष्ठानचा बिरजू जाधव याने शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसांतच बिरजू हा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना आढळून आले. कोतवाली पोलिस डिसेंबरला रात्री गस्त घालत असताना नगर कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या कब्रस्तानच्या भिंतीच्या आडोशाला तीघेजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलिस नाईक सुमित गवळी, विष्णू भागवत, नितीन शिंदे यांनी छापा टाकून टिंग्या ऊर्फ गणेश म्हसूदेव पोटे (रा. सारसनगर) याला अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा, एक जीवंत काडतूस, मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत टिंग्याचे साथीदार बिरजू जाधव समीर शेख ऊर्फ सॅम हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.
याप्रकरणी तिघांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होऊन देखील बिरजू शहरात उजळ माथ्याने फिरत होता. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याने अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. दिव्य मराठीने याबाबत वृत्त प्रसिध्द करताच जागी झालेल्या कोतवाली पोलिसांनी रविवारी बिरजूला अटक केली. कोतवालीचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली शीघ्रकृतीदर पथकातील पोलिस कर्मचारी दीपक गाडीलकर, गणेश लबडे, संदीप धामणे, अहमद इनामदार, मुकुंद दुधाळ, रवींद्र घुंगासे यांनी ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.