आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विमा योजनेतील जोखमीची व्याप्ती वाढली, लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सन २०१६ पासून राज्यात खरीप हंगामाकरिता पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भात, बाजरी, भूईमूग, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, मूग, तूर, उडीद, कापूस, मका व कांदा या पिकांचा विमा योजनेत समाविष्ट केलेला आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने या योजनेंतर्गत जोखमीची व्याप्ती वाढवली आहे. आता या योजनेतील जाेखमीची व्याप्ती ७० टक्के करण्यात आली आहे. याेजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत आहे.

 

या योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. नावीन्यपूर्ण, सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य स्थिर राखण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित केला आहे. पिकाचे उंबरठा उत्पन्न म्हणजे मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते. या योजनेंतर्गत जोखमीची व्याप्ती वाढलेली आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट.


हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे, सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जे शेतकरी विविध वित्त संस्थांकडून पीक कर्ज घेतात, अशा शेतकऱ्यांना योजना बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक राहील.

 

अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी गावपातळीवर अधिक सुविधा उपलब्ध करण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. याकरिता राज्यात कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा केंद्र) सुविधा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज भरण्याकरिता कृषी विभागाने नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलै २०१८ पूर्वी जास्तीत- जास्त संख्येने सहभागी व्हावे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील समाविष्ट महसूल मंडळे व तालुक्याच्या माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच आपल्या गावातील कृषी पर्यवेक्षक व कृषी साहाय्यक यांच्याबरोबरच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडितराव लोणारे यांनी केले आहे.
तसेच अधिक माहितीसाठी विमा कंपनीचे नाव - 'भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, नवीन स्टॉक एक्सेंज बिल्डिंग, २० वा मजला दलाल स्ट्रीट, मुंबई २३, दूरध्वनी क्रमांक ०२२ - ६१७१०९०० टोल फ्री क्र. १८००१०३००६१ व ई-मेल ro.mumbai@aicofindia.com असा आहे.

 

योजनेत समाविष्ट पीके, विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता रक्कम
भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर ४० हजार रुपये शेतकऱ्यांनी ८०० रुपये, बाजरी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर २० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी ४०० रुपये, भुईमूग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर २५ हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी ५०० रुपये, सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर ३२ हजार ५०० रुपये, तर शेतकऱ्यांनी ६५० रुपये, तीळ पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर १२ हजार ५०० रुपये, तर शेतकऱ्यांनी २५० रुपये. सूर्यफूल पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर २३ हजार १०० रुपये, तर शेतकऱ्यांनी ४६२ रुपये, मूग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर १७ हजार ५०० रुपये, तर शेतकऱ्यांनी ३५० रुपये, तूर पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर ३० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी ६०० रुपये, उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर १७ हजार ५०० रुपये, तर शेतकऱ्यांनी ३५० रुपये, कापूस पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर ३८ हजार ७५० रुपये, तर शेतकऱ्यांनी १ हजार ९३७.५० रुपये, मका पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर २६ हजार २०० रुपये तर शेतकऱ्यांनी ५२४ रुपये, कांदा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर ५५ हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी २ हजार ७५० रुपये भरावयाचे आहेत.

 

आवश्यक कागदपत्रे
विमा प्रस्ताव बँकेत सादर करताना शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत, आधारकार्डची छायांकित प्रत सादर करावी. आधार कार्ड नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती सोबत मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिट कार्ड, नरेगा जॉब कार्ड किंवा वाहन चालक परवाना यापैकी एक फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी बँकेचे कर्जखात्याशी आधार कार्ड क्रमांक जोडण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा.

 

हे शेतकरी पात्र
कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येतो. विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरायचा हप्ता दर हा खरीप हंगाम २ टक्के व रब्बी हंगाम १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित आहे.

 

बातम्या आणखी आहेत...