आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे घोटाळ्याप्रकरणी उपायुक्त दराडे निलंबित; तीन मुख्य आरोपी मात्र फरारच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरात दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या ३४ लाख ६५ हजारांच्या पथदिव्यांच्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल आहे. आता महापालिका चाैकशी समितीच्या अहवालाचा संदर्भ देत प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे यांना निलंबित करण्याचा आदेश सहसचिव श. स. गोखले यांनी काढला. वरिष्ठ दर्जाचा अधिकारी गैरव्यवहारप्रकरणी निलंबित होण्याची मनपाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. याच गुन्ह्यातील फरार तीनही आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 


शहरातील प्रभाग १ व २८ मधील पथदिव्यांच्या १९ कामांमध्ये सुमारे ३५ लाखांची अनियमितता झाल्याचे दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आले. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेतही या घोटाळ्यावर वादळी चर्चा झाली. आयुक्त घनश्याम मंगळे यांनी द्विसदस्यीय समिती नेमून चौकशीचे आदेश दिले. या समितीने चौकशी करून अहवाल आयुक्तांना सादर केला. या अहवालानुसार आरोप असलेल्या पथदिव्यांच्या कामांत गंभीर अनियमितता, बजेट रजिस्टरला नोंदी नसणे, तसेच मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या अहवालात ठेकेदार सचिन लोटके, विद्युत विभागाचे आर. जी. सातपुते, बाळासाहेब सावळे, भरत काळे, उपायुक्त विक्रम दराडे यांच्यासह संबंधित आठ ते दहा जणांची नावे आहेत. पोलिसांनीही आपला चौकशी अहवाल पोलिस अधीक्षकांना सादर केला होता. याप्रकरणी आयुक्त मंगळे यांच्या फिर्यादीवरून सातपुते, सावळे, लोटके, काळे या चौघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्याचवेळी लिपिक काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले, पण इतर तिघे फरार झाले. 


या गंभीर प्रकरणात रडारवर असलेले तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार नसतानाही पोलिसांना त्यांचा शोध लागला नाही. या घोटाळ्याचा तपास सुरू असून तपासासाठी बजेट रजिस्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात दोन उपायुक्तांची नावे चर्चेत होती. दराडे यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी आयुक्त मंगळे १७ जानेवारीला नगरविकास खात्याकडे पत्र पाठवले होते. या अहवालानुसार नगरविकास खात्याने गुरुवारी दराडेंच्या निलंबनाचे आदेश दिले. विद्युत विभागातील अनियमिततेप्रकरणी आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालातील निष्कर्ष व शिफारसी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील तरतुदीनुसार विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार आहे. नियम ४ च्या पोटनियमातील 'अ' व 'ब' मधील तरतुदीनुसार पुढील आदेश येईपर्यंत दराडे यांना निलंबित केले आहे. 


बजेट रजिस्टर पोलिसांकडेच 
पुढील तपासासाठी बजेट रजिस्टर पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्वीच ताब्यात घेतले होते. पोलिसांकडून तपास सुरू असल्याने हे महत्त्वपूर्ण रजिस्टर मनपाच्या ताब्यात देण्यात आलेले नाही. रजिस्टर वाचून फारशी कामे अडली नसली, तरी हे रजिस्टर मनपात येणे आवश्यक आहे. 


मुख्यालय सोडता येणार नाही... 
पथदिव्यांच्या कामातील अनियमिततेप्रकरणी विक्रम दराडे यांना निलंबित केले आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय नगरच राहील. विभागीय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेश शासनाने दिले आहेत. 


सातपुतेचा जामीन अर्ज फेटाळला 
पथदिवे गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी आर. जी. सातपुते व बाळासाहेब सावळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, जिल्हा न्यायालयाने हा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता आरोपींच्या अटकेप्रकरणी पोलिसांच्या कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...