आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानामुळे शहरी व ग्रामीण शाळांमधील भेद आता संपला; पालकमंत्री राम शिंदे यांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड- शहरी व ग्रामीण असा भेद तंत्रज्ञानामुळे कमी होत आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांना दिलेल्या एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण घेता येईल. भविष्यातील पिढी तयार करताना अशा पद्धतीचे शिक्षण अावश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. 


चोंडी येथे झालेल्या कार्यक्रमात पंचायत समिती व नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १०० प्राथमिक शाळांना एलसीडी प्रोजेक्टर शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. कर्जत तालुक्यातील ५४ आणि जामखेड तालुक्यातील ४५ शाळांना ७० लाखांच्या प्रोजेक्टरचे वितरण झाले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, माजी मंत्री अण्णा डांगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काठमोरे, नॅशनल इन्शुरन्सचे क्षेत्रीय प्रबंधक आर. के. एल्लाबादी, वरिष्ठ मंडल प्रबंधक प्रमिला जाधव, कर्जतच्या सभापती पुष्पा शेळके, उपसभापती प्रशांत बुध्दिवंत, जामखेडचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, कर्जतचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. 


पालकमंत्री शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेता येईल. भविष्यातील पिढी तयार करताना जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थीही प्रगत असावा, ही यामागची भूमिका आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळा आयएसओ दर्जा प्राप्त करत आहेत. 


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले. सभापती सुभाष आव्हाड व कर्जतचे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी केले. 


सीएसआरमधून मिळणार सर्व गावांना शुध्द पाणी! 
ग्रामीण भागात शैक्षणिक विकास गरजेचा आहे, त्याचप्रमाणे पिण्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे. त्यामुळेच विविध औद्योगिक आस्थापनांना त्यांचा सीएसआर निधी आर. ओ. यंत्रणेसाठी द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. लवकरच कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सर्व गावांना अशी शुद्ध पाण्याची यंत्रणा उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...