आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथर्डी: पालिका ठेकेदारीतून दोन गटांत हाणामारी, दोन गंभीर जखमी; कसबा पेठेत तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- नगरपालिकेतील ठेकेदारीवरुन कसबा पेठेत राहणारा पालिकेचा ठेकेदार व विद्यमान नगरसेवकाच्या भावात रविवारी तुंबळ मारामारी झाली. यात नगरसेवकाच्या भावासह पालिका ठेकेदार गंभीर जखमी झाला. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नगर येथे हलवण्यात आले. 


संबंधित ठेकेदार व नगरसेवकांच्या गटात पालिकेच्या ठेकेदारी कामांवरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. रविवारी दुपारी दोन्ही गटांत ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्याच्या कारणावरुन कसबा पेठेतील मारुती मंदिराजवळ किरकोळ वाद झाला. काहींच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटवण्यात आला. मात्र, सायंकाळी आंबेडकर चौकात दोन्ही गटांचे समर्थक समोरासमोर आले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. पालिकेचा ठेकेदार आपल्या ऑफिसच्या मागील बाजूने बाजार समितीच्या आवारात समर्थकांसह आला. त्याचवेळी नगरसेवकाचा भाऊ व त्याचे समर्थक जमा झाल्याने तुंबळ मारामारी झाली. यात काठ्या, दगड, दांडके याचा सर्रास वापर झाला. 


या घटनेत नगरपालिकेच्या ठेकेदारासह नगरसेवकाचा भाऊ गंभीर जखमी झाला. या घटनेची शहरात बातमी पसरताच दोन्ही गटांचे समर्थक आंबेडकर चौकात जमा झाले. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. शहरामध्ये दंगलसदृश वातावरण निर्माण होऊनदेखील पोलिसांचे अस्तित्व दिसले नाही. दुपारी झालेल्या घटनेच्या वेळी नागरिकांकडून पोलिसांना माहिती कळवली गेली होती. त्यावेळी काही पोलिस कर्मचारी घटनास्थळी येऊन गेले. मात्र, पोलिसांना घटनेचे गांभीर्य लक्षात न आल्याने सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून हा वाद न मिटवल्यास यापुढील काळात शहरात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

बातम्या आणखी आहेत...