आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहिलेली कामे पूर्ण करेपर्यंत टोल न घेण्याची सेनेची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- टोलप्रश्नी प्रांताधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. जोपर्यंत महामार्गाची राहिलेली कामे पूर्ण केली जात नाहीत, तोपर्यंत टोलवसुली बंद ठेवण्याची मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केली आहे. दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय झाला नाही, तर शिवसेनेच्या पध्दतीने पुन्हा उत्तर दिले जाणार आहे. 


एम. एच. १७ (श्रीरामपूर) पासिंगच्या सर्व चारचाकी वाहनांना हिवरगाव पावसा (संगमनेर) येथील टोलनाक्यावर टोलमाफी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या आठवड्यात शिवसेनेने आंदोलन केले. आंदोलकांनी टोलनाक्याची तोडफोड केल्यामुळे टोलचा प्रश्न चिघळला होता. तोडफोडप्रकरणी शिवसेनेच्या तालुकाप्रमुखासह वीस जणांविरोधात तालुका पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने रविवारी (२९ एप्रिल) होणारी बैठक दोन दिवस आधीच गुरुवारी संध्याकाळी घेण्यात आली. 


प्रांताधिकारी भागवत डोईफाेडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, पोलिस निरीक्षक गोकूळ आैताडे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, महामार्गाचे व टोलनाक्याचे अधिकारी आणि शिवसेनेचे अॅड. दिलीप साळगट, अप्पासाहेब केसेकर, अमर कतारी, संजय फड, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल कवडे, जालिंदर लहामगे, गुलाब भोसले, रामभाऊ राहणे, जनार्दन आहेर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 


बैठकीत टोलच्या अधिकाऱ्यांनी एम. एच. १७ पासिंगच्या सर्वच वाहनांना टोलमाफी देण्यास असमर्थता दर्शवली. आधारकार्ड दाखवल्यानंतर संगमनेरातील वाहने सोडली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हरकत घेत सर्वच वाहनांना ही माफी द्या, अशी मागणी केली. महामार्गाचे ८० टक्के काम झाल्यानंतर टोलवसुलीला परवानगी दिली गेली असली, तरी दीड वर्षाचा कालावधी उलटूनदेखील चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीने अद्याप अनेक कामे पूर्ण केली नसल्याने महामार्गावरील अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. टोलची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात अपघातातील या लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. 


चाळकवाडी (आळेफाटा) येथील टोलनाक्यावरदेखील संगमनेरातील काही लोकांना सवलत दिली जात असल्याकडे या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. काही लोकांना स्टीकर देण्यात आल्याचे समोर आले. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने टोलचे अधिकारी तेथील आमदार शरद सोनवणे यांना मोठा हप्ता देत असल्याचे बैठकीत सांगितले. महामार्गाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी भूसंपादन राहिल्याचे सांगितले. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना तालुक्यात शंभर टक्के भूसंपादन करून दिल्याचे सांगत तुम्हाला अडचण येत असेल, तर मला सांगा. मी तेथे उभा राहून तुम्हाला ताबा देतो, असे सांगितल्यानंतर महामार्गाच्या अधिकाऱ्यांना नमते घ्यावे लागले. 

 

टोलचे लाभार्थी कोण? 
या टोलनाक्याचे अनेक लाभार्थी असल्याचा आरोप अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केला. काही जणांना नोकऱ्या लावण्यात आल्या, तर काहींना कामे देण्यात आल्याचा व अनेकांना टोलचा 'मलिदा' मिळत असल्याचा बोलबोला असल्याने या टोलचे नेमके लाभार्थी कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...