आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांची अश्लील छायाचित्रे काढणारा डॉक्टर गजाआड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- साखर कामगार रुग्णालयातील डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या महिलांची अश्लील छायाचित्रे काढून सीडी तयार केल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना आलेल्या निनावी पत्रामुळे उघड झाले. संबंधित डॉक्टरने दुष्कृत्यांची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने मात्र ही घटना घडल्याचा इन्कार केला. 


योजित संजीव बार्से (वय २५, सुभाष कॉलनी, श्रीरामपूर) असे या डॉक्टरचे नाव आहे. एका सुशिक्षित महिलेने निनावी पत्र पाठवून बार्से याच्या दुष्कृत्यांची माहिती दिली. बार्से तपासणी करताना नको तेथे हात लावत असे. शिवाय तरुण महिला व मुलींचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करत असे. त्यामुळे या महिलांचे जीवन उद््ध्वस्त होण्याची शक्यता असल्याचे पत्रात नमूद करून डॉक्टरने तयार केलेल्या चित्रीकरणाची सीडी सोबत जोडत असल्याचे म्हटले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत उपअधीक्षक वाघचौरे यांनी उपनिरीक्षक श्रीराम शिंदे व हवालदार जालिंदर लोंढे यांना चौकशीचे आदेश दिले. 


चौकशीत व्हिडीओ चित्रीकरण व अर्जातील मजकुरात साम्य आढळल्याने पोलिसांनी डॉ. बार्से याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कृत्याची कबुली दिली. पोलिस नाईक रवींद्र दादासाहेब कोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरविरूद्ध विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. 


दरम्यान, शहरातील अनेक रूग्णालयांत डॉ. बार्से याने काम केले असल्याचे समजते. त्याने एक खासगी दवाखानाही चालवण्यास घेतला होता. तो सध्या बंद आहे. यापूर्वी त्याला दोन रुग्णालयांतून काढून टाकण्यात आले होते. सीडीतील चित्रीकरण तीन-चार महिन्यांपूर्वीच केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


हा प्रकार कामगार रुग्णालयातील नाही 
डॉ. बार्से दीड महिन्यापासून कामगार रुग्णालयात कामास होता. हे कृत्य तीन-चार महिन्यांपूर्वी केलेले असल्याने हा प्रकार आमच्या रुग्णालयातील नाही. शिवाय रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ असल्याने महिला व मुलींना तपासण्यासाठी पुरुष डॉक्टर जाणे शक्यच नाही.
- डॉ. रवींद्र जगधने, वैद्यकीय अधिकारी, साखर कामगार रुग्णालय, श्रीरामपूर. 

बातम्या आणखी आहेत...