आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य शिबिरांतून राजकीय अर्थ काढू नका; वंचित घटकांना सेवा देणारा मी तर साधा कार्यकर्ता...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळकी- ग्रामीण, जिरायत भागातील सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्यासाठी जनसेवा फाउंडेशन काम करत आहे. आज नव्हे, तर गेल्या अनेक वर्षांपासून विविध भागात आरोग्य शिबिरे सुरू आहेत. येत्या वर्षभरात ७५ शिबिरे घेणार आहेत. या शिबिरांतून राजकीय अर्थ काढू नका, असे युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी सांगितले. 


चिचोंडी पाटील येथे जनसेवा फाउंडेशन व डॉ. विठ्ठलराव विखे फाउंडेशन संचलित विखे हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजतर्फे आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, विनायक देशमुख, बाळासाहेब हराळ, संजय गिरवले, बाबासाहेब गुंजाळ, मनोज कोकाटे, दत्ता नारळे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, केशव बेरड, दत्तात्रय सदाफुले, आबा कोकाटे, सरपंच अंजना पवार, शरद पवार, भारती महाराज, अर्चना चौधरी, अजय बोरुडे, राजेंद्र कोकाटे, संतोष कोकाटे, शारदा ठोंबरे, बाबासाहेब काळे, अशोक मोरे आदी उपस्थित होते. 


डॉ. विखे म्हणाले, शिबिरांच्या माध्यमातून मी नगर दक्षिण मतदारसंघात फिरतो. महामार्ग सोडले, तर ग्रामीण भागात जाण्यासाठी धड रस्ता नाही, एसटी नाही, पाणी योजना नाही. वाहनांची सोय नसल्यामुळे लोक सात वाजल्यानंतर घराबाहेर पडत नाहीत. लोकं मला विविध समस्या सांगतात, पण मी काही पदाधिकारी नाही. त्यामुळे मी त्या पूर्ण करू शकत नाहीत. ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांची ही जबाबदारी आहे. वंचित घटकांना आरोग्य सेवा देणारा मी साधा कार्यकर्ता आहे. मी कधीच आरोप-प्रत्यारोप करून राजकारण केले नाही. 


रुग्णसेवा आम्ही आज करत नाही. जेव्हा विखे मेमोरिअल हॉस्पिटल सुरू झाले, तेव्हापासून गोरगरिबांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. जिल्हाभर शिबिरे घेतली जात आहेत. त्याचा लाभ सर्वसामान्यांनी घेतला पाहिजे, असे अावाहन विखे यांनी यावेळी केले. 

 

मी अद्याप कोणत्याही पक्षात नाही... 
डॉ. सुजय विखे यांनी आमच्या पक्षात येऊन लोकसभेची निवडणूक लढवावी, असे निमंत्रण जिल्हा भाजप युवा मोर्चाचे मनोज कोकाटे यांनी दिले. त्यावर काँग्रेसचे विनायक देशमुख यांनी विखे काँग्रेसकडूनच लोकसभेत जातील, असे सांगितले. त्यावर मी अद्याप कोणत्याही पक्षात नाही. मला निमंत्रणे खूप आहेत, असे डॉ. विखे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...