आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- अभियांत्रिकी सिव्हिल शाखेचा विद्यार्थी वर्धमान मनोज लुणावत याने ई- कचऱ्यावर प्रक्रिया करून रस्त्यातील खड्डे कायमस्वरूपी बुजवण्याचा पर्याय शोधला आहे. या उपक्रमाचे भारत सरकारच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयाने आयोजित राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत विशेष कौतुक झाले. हा प्रकल्प निवडल्यास ई-कचऱ्याचे व्यवस्थापन तर होईलच, शिवाय देशभरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारा मनस्तापही संपुष्टात येणार आहे.
वर्धमान लुणावत हा विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने ई-कचऱ्याचा वापर करून रस्त्यातील खड्डे कसे बुजवायचे, यावर प्रकल्प तयार केला. पुण्यात झालेल्या सोच इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत हा प्रकल्प सादर केला. स्पर्धेत देशभरातून लाखो स्पर्धक सहभागी झाले. सर्वात तरुण स्पर्धक वर्धमानचा क्रमांक १ लाख ३५ हजार २३३ वा होता. त्यापैकी टॉप २७ जणांची या स्पर्धेत निवड झाली.
वर्धमानने या स्पर्धेत त्याचा प्रकल्प, संकल्पना, तपासणी अहवाल, खड्डे बुजवल्याची छायाचित्रे मांडली होती. या उपक्रमाद्वारे महामार्ग, तसेच रस्त्यांवरील खड्डे कमी खर्चात कायमस्वरूपी कसे बुजवता येतील, तसेच ई-कचऱ्याचे व्यवस्थापनही करण्यास मदत होईल, हे विशद केले. परीक्षक पद्मश्री डॉ. शरद काळे, डॉ. मनीषा दाते, डॉ. संजय नेने, डॉ. कल्याण वामन, डॉ. प्रेमनाथ वेणुगोपालन्, डॉ. सुबोध बापट आदींनी या उपक्रमाची पाहणी केली.
बायरॅक (बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल ऑफ इंडिया) चे व्यवस्थापक उत्कर्ष माथूर यांनी वर्धमानला सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करीत या उपक्रमाचे विशेष कौतूक केले. या स्पर्धेतून अंतिम पाच जणांची निवड केली जाणार आहे. २० मार्चला ही निवड जाहीर होईल. या पाच जणांचे उपक्रम शासन प्रत्यक्षात उपयोगात आणणार आहे. त्यासाठी लागणारा सर्व खर्चही शासन करेल. वर्धमानच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. या उपक्रमासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे वर्धमानने आभार मानले आहेत.
काय आहे ई-कचरा ?
इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, मोबाइल्ससारख्या वस्तुंमुळे जगभरात पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. ई-कचऱ्याची समस्या सर्वात मोठी आहे. बिघडलेले किंवा खराब झालेले मोबाइल फोन्स, लॅपटॉप, टेलिव्हिजन संच आणि कॉम्प्युटर्स यांसारख्या वस्तुंमुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. भारतात याचे प्रमाण जास्त आहे.
हादेखील ई-कचराच
मोठ्या आकाराचे कॉम्प्युटर, मॉनिटर, स्लिम कॅबिनेट व फ्लॅट मॉनिटर्स आहेत. माऊस, की-बोर्ड, मोबाइलचे खराब स्पेअर पार्ट किंवा न चालणारी उपकरणे ही 'ई-कचरा' या प्रकारात येतात. जुन्या डिझाइन्सचे कॉम्प्युटर, मोबाइल फोन, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल आणि अन्य उपकरणे हासुद्धा ई-कचराच अाहे.
भारतही आघाडीवर
सरकारी आकडेवारीनुसार भारतात २००४ मध्ये दीड लाख टन ई-कचरा होता. सन २०१२ मध्ये तो ८ लाख टन झाला. ई-कचरा निर्माण करणाऱ्या देशातील प्रमुख शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, बंगलोर, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद या महानगरांचा आणि पुण्यासारख्या आयटी क्षेत्राशी संबंधित शहरांचा समावेश आहे. ई-कचरा हा आयटी कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर निघतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.