आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंगारमधील वेस पाडली, पण अद्याप अतिक्रमणे नाही हटली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर शहराच्या आधी अस्तित्वात असलेल्या भिंगारमधील एकुलती एक वेस काही वर्षांपूर्वी पाडण्यात आली, माळीवाडा एसटी बसस्थानकाबाहेर स्टेशन रस्त्यावर अतिशय देखणे असे इब्राहिम कारंजे असेच रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली पाडले गेले. या ऐतिहासिक वास्तूंचा बळी गेल्यानंतर तो भाग मोकळा होण्याऐवजी अतिक्रमणे उभी राहिली.


जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या काळात भिंगार वेशीचा काही भाग ढासळला. या ऐतिहासिक वेशीची डागडुजी करण्याऐवजी काही मंडळींनी ती पाडण्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे या वेशीचा बळी गेला. वेस गेली, तरी कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावरील टपऱ्या व दुकानांची अतिक्रमणे जैसे थेच राहिली. त्यामुळे भिंगारमधून जाताना वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.

 

नगर शहरात एकेकाळी चौकाचौकांमध्ये कारंजी आणि हौद होते. नागरिकांसाठी सार्वजनिक नळ आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय तेथे करण्यात आलेली होती. काळाच्या ओघात अनेक हौद व कारंजी बुजवण्यात आली. स्टेशन रस्त्यावरील माळीवाडा बसस्थानकाबाहेर इब्राहिम कारंजे होते. नक्षी असलेली कमान हे या कारंजाचे वैशिष्ट्य होते. हे कारंजे जिल्हाधिकारी विमलेंद्र शरण यांच्या काळात रस्ता रूंदीकरणासाठी पाडले गेले. प्रत्यक्षात रस्ता रूंद झाला नाही. कारंजे होते त्या जागेवर आता रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे तेथे सतत वाहतूक कोंडी होते. निदान दिल्ली दरवाजाच्या बाबतीत असे होऊ नये, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींची आहे. नगर शहरातील वाहतुकीला मुख्य अडथळा दिल्ली दरवाजाचा नाही, तर रस्त्यात पडलेले खड्डे व बंद सिग्नलचा आहे. काही खड्डे वर्षानुवर्षे बुजवले जात नाहीत. अपवाद वगळता विविध चौकांतील सिग्नलही सुरू नसतात. वाहतूक शिस्तीचा व वाहनतळाचा अभाव यामुळे शहरात कोंडी होते. त्यामुळे दिल्ली दरवाजाला हात लावण्याआधी या समस्यांचे निराकरण करा, असे चित्रकार योगेश हराळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...