आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या फोटोला पाजले दूध, संकलन केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळकी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला तिसऱ्या दिवशी नगर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांशी सर्वच गावांतील संकलन केंद्रांवर शेतकऱ्यांनी दूध नेलेच नाही. परिणामी संकलन केंद्र सुरू असूनही दूध मिळू शकले नाही. गुंडेगावमध्ये शेतकऱ्यांनी दूध ओतून, तर तालुका शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या फोटोला दूध पाजून सरकारचा निषेध केला.

 

नगर तालुक्यात प्रियदर्शनी ग्रूप, चितळकर दूध, अमूल, प्रभात यांच्याकडून सुमारे सव्वा लाख लिटर दूध दररोज संकलित केले जाते. पण शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने दूध संकलन होऊ शकले नाही. गुंडेगाव येथे ज्ञानदेव कोतकर, हनुमंत कुताळ, आप्पा कोतकर, महादेव चौधरी, कुंडलीक हराळ, नवनाथ कुताळ, संदीप भापकर, अनिल पवार, रामचंद्र कपिले या व अन्य शेतकऱ्यांनी एकत्र येत दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. नगर तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरमध्ये बाजार समितीसमोर मुख्यमंत्र्यांच्या फोटोला दूध पाजून सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांच्या दूधाला दरवाढ देण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, पंचायत समिती सभापती रामदास भोर, तालुकाप्रमुख गजानन भगत, संदीप गुंड, प्रकाश कुलट यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

 

मानोरीत टेम्पो अडवून दूध रस्त्यावर ओतले
नागपूर येथील विधिमंडळाच्या गुरूवारी होणाऱ्या बैठकीत दुधाच्या दराची कोंडी फोडण्यासाठी कुठला तोडगा निघणार, याकडे तालुक्यातील दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुधाला दरवाढ, तसेच प्रतिलिटर ५ रूपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून दुधाची वाहतूक बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या ३ दिवसांत खासगी, सहकारी दूध संघ, तसेच लहान-मोठ्या केंद्रांवर दुधाचे संकलन बंद राहिल्याने तब्बल २ कोटींचे नुकसान झाले. मंगळवारी रात्री तालुक्यातील मानोरी येथून दूध भरून चाललेला टेम्पो अडवून दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले. या घटनेचा अपवाद वगळता बुधवारी तालुक्यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी संवेदनशील भागात, तसेच नगर-मनमाड मार्गावर प्रमुख ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. दैनंदिन संकलन केंद्र बंद झाल्याने रोजच्या दुधाचे करायचे काय, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. हाॅटेलचालक ५ ते १० रूपये लिटर अशा कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून दूध घेत आहेत. तीन दिवसांपासून दुधाचे संकलन बंद असल्याने तालुक्यातील दैनंदिन व्यवहारांवर मंदीचे सावट पसरले आहे. दुधाचे दर कोसळले असताना जनावरांच्या मका, घास या हिरव्या चाऱ्याचे भाव जैसे थे आहेत.

बातम्या आणखी आहेत...