आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे! पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा संकटात, केलेल्या पेरण्याही वाया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताक्रांत आहेत. निम्मा जून सरला, तरी अजून तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या भागात पेरण्या झाल्या होत्या, त्या वाया जाण्याची चिन्हे आहेत. 


तालुक्याच्या काही भागात, टाकळी ढोकेश्वर, कन्हूर पठार, किन्ही, डिकसळ, करंदी, सुपे या परिसरात जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात काही प्रमाणात पाऊस झाला. तथापि, उर्वरित तालुका अजून कोरडाठाक आहे. पाऊस झालेल्या भागातील शेतकरीही अडचणीत आले अाहेत. पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी तेथील शेतकऱ्यांनी वाटाणा बी खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात गर्दी केली होती. तालुक्यात या वर्षी वाटाण्याच्या बियाण्याची विक्रमी विक्री झाल्याचे या भागातील कृषी सेवा केंद्र चालक सांगत आहेत. काही शेतकऱ्यांनी दोन ते पाच गोण्या पेरल्या आहेत. मात्र नंतर पाऊस न झाल्याने केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. 


असून पेरण्या खोळंबलेल्या असून पठार भागांतील शेतकऱ्यांनी अपुऱ्या वलीवर वाटाण्याच्या पेरी केल्या होत्या पण आता पाऊस न झाल्याल्याने पेरी वाया जाऊ शकतात यापुढे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये असे आवाहन तालुका क्रुषि अधिकारी रामदास दरेकर यांनी केले आहे. 


अलीकडच्या काही दिवसांत सोसाट्याचा वारा सुटल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे काही भागामध्ये अजून पावसाचा थेंबही पडला नाही तालुक्यात सध्या १६ गावात व ८०वाड्यावस्त्यांवर १५ खाजगी टँकर ३ शासकीय टँकर सुरू असून ऎकून ४६खेपा होत आहेत पाऊस न झाल्यास यात आणखी वाढ होऊ शकती. 


मृग नक्षत्राच्या आधी तालुक्यातील काही भागात पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग आनंदीत झाला होता या वर्षी देखील मागील वर्षीप्रमाणे चांगला पाऊस होईल असा कयास तेव्हा लावण्यात आला मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या त्यात मुग बाजरी मका वटाण्याच्या मोठय़ा प्रमाणात पेरण्या झाल्या परंतु मृगनक्षत्र सुरू होताच पावसाने दांडी मारली व अचानक जोरात वारे सुरू झाले वाऱ्यामुळे जमिनीत असणारा वलावा गायब झाला तसेच ढग येत असल्याने त्याचा फटका बोअरवेल व विहिरीच्या पाण्याला बसला व आहे ते पाणी कमी पडले आहे या आठवड्यात पाऊस झाला नाही तर पेरणी केलेले लाखो रुपयांचे बियाणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 


पारनेर हा दुष्काळी तालुका असून पावसाच्या भरवशावर या भागातील शेतकरी शेती करतात. मागील काही वर्षांत तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस चांगला होतो. मात्र, मान्सूनचा पाऊस पाहिजे तसा होत नाही. या वर्षी जूनमध्ये तालुक्यात १२ ते १५ मिलिमीटर पाऊस झाला. वास्तविक तो ५० ते ५५ मिलिमीटर होणे गरजेचे होते. गेल्या वर्षभरात ८४० मिलिमीटर पाऊस झाला होता. २२ जूननंतर समाधानकारक पाऊस होऊ शकतो, असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. पाऊस नसल्याने खरिपातील प्रमुख पिके मूग, बाजरी व तूर वाया जाण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले कांद्याचे पीक तालुक्यात जास्त प्रमाणात घेतले जाते, पण तेदेखील पावसावर अवलंबून आहे. 


बऱ्याच भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे. भूजलपातळी खोल गेली असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टंचाई जाणवू लागली आहे. जनावरांच्या चाऱ्याची समस्याही निर्माण होऊ शकते. पाऊस न झाल्यास प्रशासनापुढे अनेक अडचणी उभ्या राहू शकतात. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...