आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल; पेरण्या अवघ्या ३० टक्के, बियाण्यांना मागणी नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत- जून महिन्यात पावसाला दमदार सुरुवात झाली. मात्र, नंतर पावसाने दडी मारल्याने खरिपाची पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ १८ टक्के पाऊस झाला अाहे. ३० टक्के खरीप पेरण्या झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. 


मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर हजेरी लावली. हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचे भाकीत वर्तवले होते. एक-दोन दमदार पावसानंतर जमिनीत चांगली ओल निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या सुरू केल्या. मात्र, अचानक हवामान बदलले आणि पावसाने उघडीप दिली. उगवण होत नाही तोच पाण्याअभावी पिके करपू लागली. 


मागील वर्षी ११ जुलैअखेर सरासरीच्या ५२.३० टक्के पाऊस झाला होता. खरीप पेरणीचे प्रमाण सरासरी ६५ टक्के होते. या वेळी मात्र पावसाच्या अल्प प्रमाणामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आतापर्यंत अवघे १८ टक्के पावसाचे प्रमाण असून खरीप पेरण्यांचे प्रमाण अवघे ३० टक्के आहे. बहुतांश भागात पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान काही ठिकाणी झाले आहे. 


तालुक्यातील मंडलनिहाय पावसाचे प्रमाण पुढीलप्रमाणे - कर्जत (९०.५ मिमी), राशीन (९५.६६), भांबोरा (११७), कोंभळी (६७.५), माही (४६) व मिरजगाव (६८ मिलिमीटर) असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली. 


पावसाच्या अल्प प्रमाणामुळे बी-बियाणे आणि खतांना फार कमी मागणी असून आतापर्यंत अवघी २०-२५ टक्के बी-बियाण्याची विक्री झाली आहे. शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने बाजारपेठेत मंदी जाणवत आहे, असे लकी कृषी सेवा केंद्राचे संचालक विक्रम गदादे यांनी सांगितले.

 
पिके जळण्याच्या मार्गावर, चिंता वाढली 
 मका आणि भुईमुगाची पेरणी केली होती. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. पावसाने अशीच उघडीप दिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
- सत्यवान वाघमारे, शेतकरी, चिंचोली काळदात. 


भूजल पातळीत आणखी झाली घट 
मागील वर्षी पावसाच्या चांगल्या प्रमाणामुळे आतापर्यंत चांगला जलसाठा होता. त्यामुळे यावर्षी पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव आले नव्हते. मात्र, पावसाच्या अल्प प्रमाणाने भूजल पातळी कमालीची खालवली जात आहे. त्यामुळे एक-दोन गावांत पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे, असे तहसीलदार किरण सावंत यांनी सांगितले. 


तुषार सिंचनाचा अवलंब करा... 
 तालुक्यात सध्या पावसाचे प्रमाण फार कमी आहे. अनेक शेतकऱ्यांनी जून महिन्यात झालेल्या पावसावर पेरणी केली आहे. त्यांनी संरक्षित पाणी वापरावे. तुषार सिंचनाचा वापर करत पेरणी केलेले पीक वाचवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निश्चित टळेल.
- दीपक सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, कर्जत. 


पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नाही 
तालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे, परंतु पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने भीमा नदीत पाण्याचे प्रमाण वाढत आहे. कर्जत शहराला उजनी धरणाच्या बॅकवॉटरमधून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सद्यस्थितीत कर्जत शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नाही.
- नामदेव राऊत, उपनगराध्यक्ष, कर्जत.

बातम्या आणखी आहेत...