आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूतस्करांविरोधात प्रथमच एमपीडीए अंतर्गत कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हाभर फोफावलेल्या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. वाळूतस्करांच्या विरोधात आता थेट एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. कुख्यात गुंड तथा वाळूतस्कर हरिष ऊर्फ हरिभाऊ सतीश झंजाड (२९, अण्णापूर, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत पहिली कारवाई केली आहे. विशेष म्हणजे आणखी पाच वाळूतस्करांच्या विरोधात या कायद्यांतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. 


जिल्ह्यात वाळूतस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यातून अनेक गुन्हे समोर येत आहेत. गुन्हेगारीचे मूळ असलेल्या वाळू तस्करीचा िबमोड करण्यासाठी पोलिसांनी अनेक गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा कायदा एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी या गुन्हेगारांची सर्व माहिती संकलित करून त्यांच्या विरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई प्रस्तावित आहे. त्यात पहिला प्रस्ताव वाळूतस्कर झंजाड याच्या विरोधात तयार करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून त्यानुसार पोलिसांनी झजांड याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. वाळूतस्कराच्या विरोधात झालेली ही पहिलीच कारवाई असून आणखी पाच प्रस्ताव जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली. आरोपी झंजाड याच्या विरोधात पारनेर व शिरूर पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. पारनेर व शिरूर परिसरात तो मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी झंजाड यांची सर्व माहिती संकलित करून त्याच्या विरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला, प्रस्तावास मंजुरी मिळताच झंजाड याच्या विरोधात कारवाई करण्यात आली. 


नेमका काय आहे एमपीडीए कायदा 
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, तसेच औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एपीडीए कायदा करण्यात आला. यात आरोपीला एका वर्षासाठी तत्काळ स्थानबध्द (तुरूंगवास) करण्यात येते. याविरोधात केवळ उच्च न्यायालय व मंत्रालयात दाद मागता येते. 


जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिली तत्काळ मंजुरी 
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने अनेक गुन्हेगारांच्या विरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाईचे प्रस्ताव तयार केले. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून या प्रस्तावांना केराची टोपली दाखवण्यात आली. मागील दोन-तीन वर्षांत असे सहा प्रस्ताव फेटाळण्यात आले. नूतन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मात्र वाळूतस्कर झंजाड याच्या विरोधातील प्रस्तावास तत्काळ मंजुरी दिली. आठ वर्षांपूर्वी श्रीरामपूर येथील कुख्यात गुंड संतोष वायकर याच्या विरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली होती. 


पोलिस उद्दिष्ट पूर्ण करणार 
एमपीडीए कायद्यांतर्गत अनेक वर्षानंतर कारवाई झालेली आहे. त्यात या कायद्यांतर्गत प्रथमच वाळू तस्कराच्या विरोधात कारवाई करण्यात आली. एमपीडीएचे आणखी प्रस्ताव तयार असून मंजुरी मिळताच संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात येईल. पोलिस आता आपले उद्दिष्ट पूर्ण करत आहेत.
- घनश्याम पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक 


तहसीलदार सागरेंवर केला होता हल्ला 
पारनेर येथील तहसीलदार भारती सागरे यांनी वाळू तस्करांच्या विरोधात कारवाई केली होती. त्यावेळी आरोपी झंजाड यांनी त्यांच्यावर हल्ला केला. झंजाडच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. झंजाड हा आपल्या साथीदारांसह मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करत होता. त्याच्या विरोधात इतर गुन्हे देखील दाखल आहेत.
- दिलीप पवार, निरीक्षक, स्थानिक गुन्हे. 

बातम्या आणखी आहेत...