आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी : वैमानिकाचे नियंत्रण हुकल्याने विमान रनवेवरून 100 फूट खाली; 42 जण वाचले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी/औरंगाबाद-  शिर्डीच्या साईबाबा अांतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा विमान अपघात थोडक्यात टळला. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्सचे मुंबईहून आलेले विमान सोमवारी सायंकाळी ४.५० वाजता लँडिंग करताना मूळ धावपट्टीच्याही १०० मीटर पुढे राखीव भागापर्यंत गेले. तेथे ते मुरूम आणि मातीत जाऊन थांबले. सुदैवाने या थरारक घटनेत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. चार केबिन क्रू कर्मचाऱ्यांसह सर्व ४२ प्रवासी सुखरूप आहेत. प्रथमदर्शनी विमानाचेही काही नुकसान झालेले नसल्याचे दिसत होते. विमान वाहतूक नियामक डीजीसीए आणि एअर इंडियानेही या घटनेच्या चौकशीचे आदेश 
दिले आहेत.

 

 मंगळवारी डीजीसीएची टीम येऊन विमान आणि घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. या प्रकारामुळे विमानतळ कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रचंड पळापळ झाली. नेमके काय झाले हे कुणालाच कळेना. त्यामुळे प्रवाशांमध्येही घबराट पसरली. विमानतळ व्यवस्थापक धीरेन भोसले, एअर अलायन्स कंपनीचे अधिकारी फलटणकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी देविदास पवार यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. विमानाचा दरवाजा उघडला. सर्व प्रवाशांना खाली उतरवत धीर दिला. यानंतर शिर्डीहून सायंकाळची हैदराबाद व मुंबई ही दोन्हीही विमाने रद्द करण्यात आली.  

 

साईबाबांमुळे वाचलो

घटनेनंतर विमानातील प्रवाशांनी साईबाबांचा नामाचा गजर केला. एक प्रवासी म्हणाला, साईबाबांमुळेच आम्ही बचावलो.आज आमचं काही खरं नव्हतं. आधी याबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हते. परंतू, विमानाचा अपघात थोडक्यात टळल्याचे कळाल्यानंतर सर्वच प्रवाशांनी साईनामाचा गजर केला.

 

नेमके काय घडले 
मुंबईहून ४२ प्रवासी घेऊन आलेले विमान शिर्डी येथील विमानतळावर सायंकाळी ४.५० वाजता उतरत होते. वैमानिकाचे विमानाच्या वेगावरील नियंत्रण सुटले. विमान मूळ धावपट्टीवर लँड हेण्याऐवजी रिझर्व्ह एरियासाठी उभारलेल्या विस्तारित धावपट्टीवर १०० फूट पुढे गेले. सुदैवाने पुढे मोकळे मैदान असल्याने विमानाची धडक झाली नाही. 

 

धावपट्टीनंतर अनेक मीटर सपाटीकरण केलेले मैदान 
विमानतळाचे व्यवस्थापक धीरेन भोसले यांच्यानुसार, मूळ धावपट्टीनंतरही रिझर्व्ह एरिया म्हणून माती व मुरमाने सपाटीकरण केलेले मैदान असते. आपत्कालीन परिस्थितीत विमान धावपट्टीवरून घसरले तरी ते नियंत्रित करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी ही उपाययोजना केलेली असते. 

 

आज शिर्डीत विमानसेवा विस्कळीत राहणार
डीजीसीएची टीम मंगळवारी शिर्डी विमानतळावर येईल.  विमान व धावपट्टीची पाहणी करण्यात येईल. तोवर शिर्डीहून विमानसेवा बंदच असेल. टीमने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच शिर्डीहून विमानसेवा पूर्ववत सुरू होणार आहे. 

 

धावपट्टी छोटी, लहान विमानेच उतरू शकतात
३५० कोटी रुपयांच्या खर्चाने उभारलेल्या विमानतळाचे गतवर्षी उद्््घाटन झाले होते. येथून शिर्डी ते मुंबई, शिर्डी ते हैदराबाद ही विमाने सुरू आहेत. यासाठी एटीआर - ७२ विमाने वापरली जातात. केवळ २,५०० मीटर धावपट्टीमुळे येथे एअरबस ए-३२० वा बोइंग ७३७ अशी छोटी विमाने उतरू शकतात. 

 

> दोष कुणाचा? घटनेबाबत दोन अधिकाऱ्यांत मतभिन्नता 

वैमानिकाचा वेग नियंत्रणाबाहेर  

प्राथमिक चौकशीत वैमानिकाला वेग आवरता अाला नाही. यामुळे विमान जेथे लँड व्हायला हवे होते तेथे न होता ते राखीव जागेत गेले. घटनेचा अहवाल देण्याच्या सूचना व्यवस्थापनाला दिल्या आहेत. 

- सुरेश काकाणी, एमडी तथा उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ कंपनी

 

वैमानिकाचे प्रसंगावधान कामी 
विमान लँड होत असताना रनवे संपतो तेथून १०० फुटांपर्यंत पुढे गेले. वैमानिकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळला. विमानतळावर सुरक्षिततेच्या उपाययोजना आहेत. त्यामुळे या घटनेत हानी टळली.
- धीरेन भोसले, व्यवस्थापक, शिर्डी साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...