आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसील कार्यालयांपुढे दुधाचा फुकट रतीब, शेतकरी संघटना रस्त्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर, पारनेर- सरकारी दूध धोरणाच्या विरोधात शेतकरी संघर्ष समितीने पुकारलेले आंदोलन जिल्ह्यात प्रखर झाले आहे. अकोले, श्रीरामपूर, पारनेर, नेवासे व इतर तहसील कार्यालयांना घेराव घालून शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांसह भूमिपुत्र शेतकरी संघटना, पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आदी स्वयंसेवी संघटनांही सहभाग घेतला. शुक्रवारपासून गावोगावी आंदोलने होणार आहेत. 


पारनेरमध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेने गुरूवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, प्रदेश प्रवक्ते अनिल देठे यांच्या नेतृत्वाखाली मोफत दूध वाटप केले. तहसीलदार भारती सागरे उपस्थित नसल्याने त्यांच्या दालनासमोर दुधाची किटली व दुधाने भरलेले कप ठेवण्यात आले. नायब तहसीलदार आर. बी. कासवटे, सचिन शिंदे व इतर कर्मचाऱ्यांना दूध देण्यात आले. 


राज्यात सध्या दुधाचे दर नीचांकी झाल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. सरकारने ३.५ फॅट असलेल्या दुधाला २७ रूपये लिटर दर देण्याचे जाहीर केले असूनही शेतकऱ्यांना तो दर मिळत नाही. उलटपक्षी वर्षभरात दुधाच्या दरात प्रतिलिटर दहा रूपयांनी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचा व्यवसाय मोडकळीस आला आहे, असे संतोष वाडेकर म्हणाले. तहसील कार्यालयांपुढे मुख्यमंत्र्यांच्या दगडाच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना दुग्धाभिषेक करण्यात आला. 


बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलकांनी घोषणाबाजी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात शेतकरी नेते गुलाबराव डेरे, भूमिपुत्रचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक आंधळे, तालुकाध्यक्ष रोहन आंधळे, मंजाबापू वाडेकर, पांडुरंग पडवळ, पांडुरंग जाधव, नंदन भोर, तुषार औटी, धीरज महांडुळे, सचिन नगरे, विष्णू दाते, सुरेंद्र माने, संदीप कड, बाळासाहेब ढगे, भाऊसाहेब कोकाटे, रखमाजी कावरे, अरूण गवळी आदी शेतकरी सहभागी झाले. 


""प्या, प्या शेतकऱ्यांचे दूध फुकट प्या, घ्या घ्या शेतकऱ्यांचा तळतळाट फुकट घ्या, ग्राहकांचे व शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या सरकार मुर्दाबाद'' अशा घोषणा देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक डॉ. अजित नवले, कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, महेबबू सय्यद, कान्हू सुंबे, अंबिका नागुल, संतोष वाडेकर, अनिल देठे, रोहन आंधळे, रईस शेख सहभागी झाले होते. 


आत्महत्येची वेळ आणली 
केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला नाही. शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायाला सरकार २७ रुपये लिटरप्रमाणे भाव जाहीर करते, मात्र त्याची अंमलबजावणी करीत नाही. शेतकऱ्यांचे दूध १७ रुपये लिटरप्रमाणे घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली अाहे.
- अजित नवले, आंदोलनाचे निमंत्रक. 

बातम्या आणखी आहेत...