आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका लग्नाचे नाटक! दुसऱ्याच दिवशी पळाली नवरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- आई व मुलीने संगनमत करून पांगरी (ता. सिन्नर) येथील तरूणाशी लग्नाचे नाटक केले. तरूणाकडून ५० हजार रूपये रोख घेतले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दागिन्यांसह दोघी पसार झाल्या. याप्रकरणी या महिलांसह लग्न जमवणाऱ्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 


अनिता प्रकाश रोकडे (आई), प्रियंका प्रकाश रोकडे (मुलगी, दोघी वाॅर्ड ७, श्रीरामपूर), जाकीर ऊर्फ बाबासाहेब बबन पटारे (आंबेडकर वसाहत, दत्तनगर) अशी आरोपींची नावे आहेत. किशोर एकनाथ पगार (३२) हा सिन्नर येथील औषध कंपनीत नोकरीस आहे. अनेक वर्षांपासून लग्न जमत नसल्याने त्याने कोळपेवाडी येथील मामाचा मुलगा संजय यादव आवारे याच्याशी संपर्क साधला. संजयचा मित्र किरण इंगळे याने दत्तनगर येथील पटारे याच्याशी त्याची ओळख करून दिली. 


पटारे याने प्रियंका व अनिताची भेट घालून दिली. प्रियंका लग्नाची असून अनिता तिची बहीण असल्याचे सांगण्यात आले. रोकडेऐवजी शिंदे आडनाव सांगितले. २८ जूनला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम दत्तनगर येथे पटारेच्या घरी पार पडला. यावेळी किशोरची आई, मामा, भाऊ उपस्थित होते. मुलगी पसंत असल्याने लगेच लग्न करण्याचे ठरले. पटारे व अनिताने ५० हजारांची मागणी केली. मुलगी पसंत असल्याने आपसात पगार कुटुंबीयांनी पैशांची व्यवस्था केली. त्याच सायंकाळी माळ पद्धतीने विवाह झाला. 


प्रियंका पगार कुटुंबीयांसमवेत सिन्नरला गेली. अनिता तिची कलवरी बनून गेली. दुसऱ्या दिवशी पगार कुटुंबीयांनी पांगरी येथील भक्ताच्या मळ्यात किशोर व प्रियंकाचा रितसर विवाह लावून दिला. यावेळी तिच्या अंगावर ७ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र घालण्यात आले. 


लग्न झाल्यानंतर अनिताने श्रीरामपूरला मामाच्या घरी जाऊन येण्याचा आग्रह धरला. रविवारी त्या दोघी, किशोर, भाऊ संदीप, आई मंदाकिनी, मामा ज्ञानेश्वर आवारे, मामेभाऊ संजय आवारे, त्याची पत्नी अरूणा श्रीरामपूरला आल्या. पडघम रूग्णालयानजीक प्रियंका त्यांना मावशीच्या घरी घेऊन गेली. चहापाणी झाल्यानंतर अनिता व प्रियंका साडी घेण्यासाठी दुकानात जाऊन येतो, असे सांगून बाहेर गेल्या. मात्र, परत आल्याच नाहीत. मोबाइलवर संपर्क साधला असता तो बंद असल्याचे आढळले. 


आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किशोर व कुटुंबीयांनी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 


विवाह जमवून देणाऱ्या शहरात अनेक टोळ्या 
विवाह जमवून देण्याच्या नावाखाली अनेक टोळ्या शहरात कार्यरत आहेत. विवाह नोंदणी संकेतस्थळावरून लग्न जमत नसलेल्या मुलांना शोधून त्यांना अशा प्रकारे फसवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, अब्रू जाण्याच्या भीतीने पोलिसात तक्रार केली जात नाही. 

बातम्या आणखी आहेत...