आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगावच्या अंबिका पतसंस्थेने घातला ठेवीदारांना लाखोंचा गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना ठेवीदारांनी निवेदन दिले. - Divya Marathi
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना ठेवीदारांनी निवेदन दिले.

नगर- जास्त व्याजाचे आमिष दाखवून केडगावच्या अंबिका ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने नगरमधील बंद पडलेल्या पतसंस्थांचा कित्ता गिरवत ठेवीदारांना लाखोंचा गंडा घातला आहे. संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव नारायण कोतकर व त्यांचे पुत्र नगरसेवक सुनील सर्जेराव कोतकर यांनी ठेवीदारांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे. ठेवीदारांकडे असलेल्या ठेव पावत्या व संस्थेच्या रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या रकमेतही प्रचंड तफावत असल्याने ठेवीदार हादरले आहेत. अगदी जिल्हा उपनिबंधकांच्या (सहकारी संस्था) म्हणण्यानुसार तक्रारी ३० लाखांच्या ठेवींबाबत आहेत, तर ठेवीदारांचे म्हणणे किमान सव्वा कोटींचा गैरव्यवहार आहे. पैसे मिळत नसल्याने ठेवीदार आता तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. 


ही पतसंस्था केडगावात १८ फेब्रुवारी १९९५ रोजी सुरू झाली. सुरुवातीला चांगले व्यवहार असल्याने लोकांनी विश्वासाने संस्थेत ठेवी ठेवण्यास सुरुवात केली. मात्र, सन २०१६ पासून लोकांना ठेवींचे पैसे मिळेनासे झाल्यावर ठेवीदारांच्या मनात संशय निर्माण झाला. विशेष म्हणजे या संस्थेत अध्यक्ष व व्यवस्थापक यांच्या आप्तेष्टांच्याही ठेवी आहेत. आपला विश्वासघात झाल्याचा त्यांना मोठा धक्का बसला आहे. 


अध्यक्ष कोतकर यांनी मात्र ठेवींच्या गैरव्यवहाराबद्दल व्यवस्थापक संतोष गोविंद पानसरे यांच्याकडे बोट दाखवून यातून अंग काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थापक पानसरे यांनी ठेव पावत्यांवर बनावट सह्या करून संस्थेत गैरव्यवहार केला. ठेवीदार सहा महिन्यांपासून सातत्याने संस्थेच्या नगर-पुणे रस्त्यावरील कार्यालयात चकरा मारत आहेत. त्यांना 'ऑडिट चालू आहे,' असे एकच छापाचे उत्तर मिळत आहे. काय ऑडिट सुरू आहे, त्यातून काय बाहेर पडले आहे, याची माहिती मिळत नाही. उलट 'पत संस्थांबाबत तुम्हाला माहिती नाही का? तुम्ही त्यात पैसेच का गुंतवले?' असा सवाल केला जातो. एका लेखापरीक्षकाने तर ठेवीदारांना 'तुमचे पैसे आता मिळणार नाहीत,' असेही ठणकावून सांगितले. ठेवीदार मध्यमवर्गीय आहेत. दोन-तीन टक्के जास्त व्याजदरासाठी त्यांनी पैसे ठेवले. संचालक स्थानिक व ओळखीचे होते. त्यामुळे ठेवीदारांच्या मनात विश्वासाची भावना होती. ठेवीदारांत काही निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी आपली आयुष्यभराची पुंजी येथे ठेवली आहे. त्यांना आता संस्थेमधील गैरव्यवहारांमुळे पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे.

 
कर्ज नाही, त्यांनाही दिल्या नोटिसा... 
गैरकारभार चव्हाट्यावर आल्यानंतर संस्थेच्या कारभाराचे लेखापरीक्षण सुरू आहे. त्यावेळी कर्जदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या. विशेष म्हणजे, त्यावेळी कर्जदारांबरोबरच चक्क ज्यांच्यावर काहीही कर्ज नाही, त्यांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यापैकी काही ठेवीदार संस्थेत विचारणा करण्यासाठी गेले असता, त्यावेळीही अध्यक्ष व व्यवस्थापकांनी एकमेकांकडे बोट दाखवले. 


लेखापरीक्षण सुरू 
सध्या संस्थेचे लेखापरीक्षण करणारे लेखापरीक्षक शिरीष कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, अंबिका संस्थेचे लेखापरीक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. ते पूर्ण होण्यास जास्त कालावधी लागणार आहे. हा कालावधी किती असेल, हे आताच सांगता येणार नाही. सर्व माहिती हाती आल्याशिवाय काहीही बोलता येणार नाही. 


लग्नालाही मिळाले नाहीत पैसे 
एका महिलेने आपल्या मुलीच्या लग्नासाठी पतसंस्थेत मोठी ठेव ठेवली होती. मुलीचे लग्न जमल्यावर त्यांनी आपल्याला पैसे मिळावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मुलीच्या लग्नाची पत्रिकाही त्या घेऊन गेल्या, पण त्यांना एक रुपयाही परत मिळाला नाही. त्यामुळे हक्काचे पैसे असताना कर्जाने रक्कम घेऊन मुलीचे लग्न केले. अशाच घटना अनेक ठेवीदारांच्या बाबतीत घडल्या आहेत. 


संचालक मंडळाला जबाबदार धरा... 
या संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव नारायण कोतकर, उपाध्यक्ष ज्ञानदेव वामनराव शिंदे, सचिव रामचंद्र सबाजी औटी व सदस्य सुनील सर्जेराव कोतकर, शंकर हरिभाऊ ठोंबरे, अॅड. राकेश संभाजी पाटील, नवनाथ आनंदा वीरकर, नारायण शंकर शेळके, महादेव राजाराम बोरकर, लता रमेश शेरकर, शकुंतला तुकाराम कुंभार यांना गैरव्यवहाराबद्दल जबाबदार धरून कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली.

बातम्या आणखी आहेत...