आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक विल्हेवाटीची चिंता करू नका...कचऱ्यापासून तयार होते इंधन !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी घातक असलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून चक्क इंधन निर्मिती करण्याचा अभिनव प्रकल्प पारनेर तालुक्यातील सुपे एमआयडीसीमध्ये सुरू आहे. नगरचे उद्योजक क्षितीज झावरे व पुणे येथील श्रीरंग भातखंडे यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात दररोज १२ टन प्लास्टिक कचऱ्यापासून तब्बल सहा हजार लिटर इंधन तयार होते. नाशिक व अहमदाबाद येथेही त्यांनी हा प्रकल्प सुरू केला असून नगर शहरातील सर्व प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रियेची जबाबादारी घेण्यास हे उद्योजक तयार आहेत.


असे बनते इंधन 
क्रूड ऑईलपासून पेट्रोल, डिझेल, नाफ्ता तयार होते. प्लास्टिकमध्येदेखील क्रूड ऑईल असते. प्लास्टिकमधील लाँगर हायड्रोकार्बन चेन ब्रेक करून तिचे स्मॉलर चेनमध्ये रुपांतर केले जाते. त्यानंतर एका ठरावीक तापमानात कॅटेलिस्ट हा पदार्थ ऑक्सिजनचा संपर्क येऊ न देता त्यात टाकला जातो. त्यानंतर प्लास्टिकपासून इंधन तयार होते. आतापर्यंत अनेक महापालिकांमध्ये असा प्रयोग करण्यात आला, परंतु तयार झालेले इंधन घट्ट होत असल्याने त्याला यश आले नाही. झावरे व भातखंडे यांचा प्रयोग यशस्वी ठरला. 


प्लास्टिक कचऱ्याचा शंभर टक्के पुनर्वापर 
इंधन निर्मिती प्रकल्पात पुनर्वापर न होणारे प्लास्टिक वापरले जाते. सुमारे एक हजार िकलो प्लास्टिक कचऱ्यापासून पाचशे लिटर इंधनाची निर्मिती होते. त्याचबरोबर काही प्रमाणात गॅस तयार होतो. हा गॅस पुन्हा प्रकल्पातच इंधन निर्मितीसाठी वापरला जातो. इंधन व गॅससह काही प्रमाणात कार्बनदेखील तयार होते. तोदेखील वापरात येते. प्रकल्पात आणलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे शंभर टक्के विघटन करून त्यातून शंभर टक्के वापरात येणारे इंधन, गॅस व कार्बन तयार केला जातो. 


नगर महापालिकेने सहकार्य करावे 
सरकारने सर्व प्लास्टिक उत्पादनांवर बंदी आणलेली नाही. नगर महापालिकेने आम्हाला सहकार्य केल्यास शहरातील सर्व प्लास्टिक कचरा आम्ही घेण्यास तयार आहोत. नगर शहरातही असाच प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रशासनाने सहकार्य करणे गरजेचे आहे.
- क्षितिज झावरे, प्रकल्प संचालक. 


व्यावसायिक स्तरावर प्रकल्प यशस्वी 
आम्ही दहा वर्षे संशोधन करत व्यावसायिक रूप दिले. अनेक अडचणी आल्या, परंतु न डगमगता प्रकल्प यशस्वी केला. आज आम्ही हजारो टन प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती करत आहोत. असा प्रकल्प कुठेही नाही. इतर शहरांत असे प्रकल्प सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
- श्रीरंग भातखंडे, प्रकल्प संचालक. 

बातम्या आणखी आहेत...