आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडेखोरांची टोळी गजाआड; राहुरी पोलिसांची कामगिरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली श्रीरामपूर येथील सराईत दरोडेखोरांची टोळी राहुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी जेरबंद केली. तलवार, सत्तूर, कोयता या धारदार शस्रांबरोबरच लाकडी दांडे, मिरचीची पूड व दरोड्यासाठी वापरण्यात आलेली इंडिका कार व मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली. 


राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ५ दरोडेखोरांना सोमवारी राहुरीच्या न्यायालयात उभे करण्यात आले. त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या टोळीतील २ दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. 


नगर-मनमाड मार्गावरील गुन्हेगारीचे केंद्रबिंदू ठरलेल्या राहुरी-शिंगणापूर फाट्याजवळ रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राहुरी पोलिसांनी ही कारवाई केली. शिंगणापूर फाट्याजवळ दरोडेखोरांची टोळी असल्याची निनावी खबर मिळाल्याने पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्याचा सुगावा लागल्याने दरोडेखोरांनी आपली वाहने जागेवर सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सर्तकतेमुळे तो अयशस्वी ठरला. 


या कारवाईत सादिक बशीर शेख (नेवासे), संतोष सुरेश कांबळे, साबीर शब्बीर सय्यद, अन्वर लतिफ मन्सुरी, सागर सुरेश कांबळे या गुन्हेगारांच्या राहुरी पोलिसांनी मुसक्या आवळत दरोड्यासाठी वापरण्यात आलेली इंडिका कार क्रमांक एम.एच.०४ व्ही.एम.५४३६ तसेच मोटरसायकल एम. एच.१७ बी.क्यू.५१७० जप्त केली. या टोळीतील एकनाथ सोनवणे व बबलु शहा (राहणार वार्ड नंबर २ श्रीरामपूर) हे फरार झाले आहेत. 


पोलिस चौकी धुळखात पडून 
जागतिक ख्याती असलेली धार्मिक स्थळे म्हणून शिर्डी व शनिशिंगणापूर या देवस्थानांची ओळख आहे. नगर-मनमाड राज्यमार्गावरील राहुरी हे देवस्थानकडे जाणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने भाविकांची लूट करण्यासाठी शिंगणापूर फाट्यावर दरोडेखोरांनी बस्तान बांधले आहे. महिन्याभरापूर्वी राहुरी-शिंगणापूर या फाट्याजवळ शिर्डी येथील सराईत सरोदे टोळीला पकडण्यात आले होते. त्यापाठोपाठ श्रीरामपूर येथील दरोडेखोरांची टोळी पकडण्यात आली. गेल्या ३ वर्षांत रस्तालुटीच्या अनेक घटना शिंगणापूर फाट्याच्या परिसरात घडल्या आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस चौकी बांधण्यात आली आहे. मात्र, या चौकीचा वापर सुरू करण्यास मुहूर्त मिळाला नसल्याने ती धूळखात पडून आहे. 

बातम्या आणखी आहेत...