आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाह्यवळण’च्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीचे ‘गेट बंद’; अधिकाऱ्यांना कोंडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अनेकदा आश्वासन देऊनही नगर शहराच्या बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होत नसल्याने नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आत कोंडण्यात आले. बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. 


या आंदोलनात राष्ट्रवादीचे पक्षाचे नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ दरेकर, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, वैभव म्हस्के, अक्षय भिंगारदिवे, अजय शेडाळे, पवन कुमटकर, अजय वाघ, अक्षय रोहकले, मयूर निर्वाण, सागर सुनसळे, प्रवीण येलुलकर, दीपक दरेकर, किरण ठुबे, पापामियॉ पटेल, ओंकार गोंडळकर, देवीदास टेमकर, अशोक कोकाटे, मोहन बोठे, सुहास कासार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


बाह्यवळण रस्त्याची तातडीने दुरुस्ती होण्याच्या मागणीसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागील महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी एक जानेवारीच्या आत रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापि बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू झाल्याने नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रमक पवित्रा घेऊन गेटबंद आंदोलन करण्यात आले. 


वाळूंज बायपास ते निंबळक मार्गे विळद घाटापर्यंत बाह्यवळण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली अाहे. ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. या खड्ड्यांमुळे मोठे ट्रक उलटण्याचा घटना दररोज घडत आहेत. अक्षरश: जीव मुठीत धरुन वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा रस्ता पूर्णत: धुळीने माखल्याने या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रस्ता खराब असल्याने अनेक अवजड वाहने शहरात शिरत अाहेत. शहरातून जाण्यास अवजड वाहनांना बंदी असली, तरी ती झुगारून वेळप्रसंगी दंड भरण्याची तयारी ठेवून वाहने शहरातून जात आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांचीही वाट लागत आहे. शिवाय अंतर्गत वाहतूकही कोंडीमुळे सतत विस्कळित आहे. त्यामुळे नगरकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 


वाहतूक कोंडीचा अपघाताचा प्रश्न सततच निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. सहायक अभियंता अंकुश पालवे यांनी आंदोलकांशी चर्चा करून, दुरुस्तीचे काम देण्यात आलेल्या संबंधीत ठेकेदाराशी संपर्क सांधून गुरुवार २५ जानेवारीच्या आत बाह्यवळण रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. दिलेल्या आश्वासनाच्या मुदतीमध्ये या रस्त्याचे काम सुरू झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय बंद पाडून चक्का जाम आदोलन करण्याचा इशारा गहिनीनाथ दरेकर यांनी दिला. 


रस्त्याला मिळाला ठेकेदार 
शहरातील अवजड वाहतूक टाळण्यासाठी तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तयार झालेल्या बाह्यवळण रस्त्याची पुरती वाट लागली आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. पण अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता आता पूर्ण नामशेष होत आहे. मनमाड रोड ते कल्याण रोडपर्यंतचा रस्ता चार चाकी तर सोडाच पण, दुचाकी चालवण्याच्याही लायकीचा राहिलेला नाही. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यावरून जाणारे मोठे ट्रक उलटून अपघात होत आहेत. 


गेल्या एप्रिल महिन्यात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार दिलीप गांधी यांच्या प्रयत्नांतून १६ कोटींचा निधी मिळाला, पण जीएसटी अन्य अडचणी दाखवत ठेकेदारांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकले नव्हते. अधीक्षक अभियंता भोसले यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याच्या निविदेचा मार्ग मोकळा होऊन ठेकेदाराहीची नियुक्ती झाल्याची माहिती समजली, 

 

ठेकेदारांचा संप मागे 
गेल्याऑगस्ट महिन्यात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १६ कोटींच्या निविदेची सूचना जाहीर करण्यात आली. तिची मुदत संपली, तरी एकही ठेकदाराने हे काम करण्यात रस दाखवला नाही. त्यामुळे तीन ऑक्टोबर रोजी पुन्हा दुसरी निविदा जाहीर करण्यात आली आहे. तिचीही मुदत संपली. त्यानंतर ठेकेदारांनी आपला संप मागे घेतल्याने आंदोलकांना मिळालेल्या आश्वासनाप्रमाणे १५ दिवसांत काम सुरू होण्याची अपेक्षा ‘सार्वजनिक बांधकाम’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...