आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयांच्या परिसरात मजनूंची दहशत कायम; 'दामिनी' पथक सक्रिय, बीट मार्शल कागदावरच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शाळा-महाविद्यालये, तसेच सार्वजनिक ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाने 'दामिनी' पथक स्थापन केले. वेळप्रसंगी बीट मार्शल पाठवले जातात. मात्र, या कारवाईत सातत्य नसल्याने शाळा-महाविद्यालय परिसर, तसेच सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रमाण वाढत आहे. दामिनी पथकाने गेल्या सहा महिन्यांत अवघ्या ७५ रोडरोमिओंविरोधात कारवाई केली. बीट मार्शल अद्याप कागदावरच असल्यानेे रोडरोमिओंची हिम्मत वाढत आहे. परिणामी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


शाळा-महाविद्यालयांमध्ये हजारो मुली शिक्षण घेत आहेत. त्यात ग्रामीण भागातील मुलींची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी पोलिस प्रशासन कमी पडत आहे. शाळा- महाविद्यालय परिसर, बसस्थानक, खासगी क्लास, शोरुम, महिलांची गर्दी असलेल्या बाजारपेठा, चौपाटी कारंजा परिसर, चित्रपटगृह, उद्याने, िकल्ला परिसर आदी ठिकाणी मुलींची छेड काढण्याचे प्रकार समोर येत आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी सुरूवातील निर्भया पथक स्थापन करण्यात आले. मात्र, हे पथक एकाच वेळी सर्वच भागात जाऊ शकत नाही. त्यामुळे दामिनी पथकाची संकल्पना राबवण्यात आली. मागील काही दिवसांपासून दामिनी पथक सक्रिय आहे. पोलिस उपनिरीक्षक तथा दिलासा सेलच्या प्रमुख कल्पना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करते. पथकामध्ये सहायक फौजदार, चालक, तसेच दोन महिला पोलिस आहेत. या पथकाने जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ७५ रोडरोमिओंवर कारवाई केली. दामिनी पथकासह बीट मार्शलची रोडरोमिओंवर कारवाई करण्याची जबाबदारी आहे. कोठे काही अनुचित प्रकार आढळला, तर तत्काळ हस्तक्षेप केला जातो. एखादी तक्रार आली, तर त्याची दखल घेऊन तत्काळ कारवाई करण्यात येते. मात्र, एकटे दामिनी पथक पुरेसे नसून ते एकाच वेळी सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी छेडछाडीच्या प्रकारांना रोमिओंना आळा घालण्यासाठी आणखी काही पथके तयार करण्याची गरज आहे. 


पथकांची संख्या वाढवण्याची गरज 
तारकपूर, माळीवाडा, स्वस्तिक बसस्थानकापासून महाविद्यालये, शाळांमध्ये विद्यार्थिनी येतात. अशा परिसरात तरुणांचे टोळके भरधाव वेगात जोराने हॉर्न वाजवत जातात. विद्यार्थिनींची छेड काढली जाते. अशा रोडरोमिओंना छेडछाडविरोधी पथकाकडून समज दिली जाते. मात्र, हे पथक निघून गेले की, पुन्हा छेडछाड सुरू होते. त्यासाठी दामिनी पथकांची संख्या वाढवण्याची मागणी पालक वर्गातून पुढे येत आहे. 


बीट मार्शल कागदावरच 
निर्भयानंतर दामिनी पथक तयार करण्यात आले. या पथकाच्या जोडीला प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अंतर्गत बीट मार्शल पथकदेखील कार्यरत आहे. परंतु बीट मार्शलचे पोलिस कर्मचारी शाळा-महाविद्यालयांकडे फिरकतदेखील नाहीत. हे पथक अद्याप कागदावरच आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक विश्वास नांगरे यांच्या कार्यकाळातील ब्लॅक कमांडो पथकामुळे छेडछाडीचे प्रकार थांबले होते. असे पथक पुन्हा स्थापन करण्याची मागणी पालक वर्ग करत आहे.


तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची गरज 
शाळा- महाविद्यालयांमध्ये दामिनी पथकाचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. गस्तीवर असलेल्या वाहनावरही हे क्रमांक आहेत. मुलींनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे. रोडरोमियोंवर कारवाई केल्यानंतर त्यांना समज देत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. सहा महिन्यांत ७५ रोमिओंवर कारवाई केली. गस्त सुरूच आहे, सार्वजनिक ठिकाणीही अनेक रोमिओ सापडतात. पालकांनीदेखील आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे.
- कल्पना चव्हाण, प्रमुख, दामिनी पथक. 

बातम्या आणखी आहेत...