आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोधेगावला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्या, कृती समितीमार्फत लढ्याची तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोधेगाव- सामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे हित साधले जावे, शासकीय कामे त्वरित व्हावीत याकरिता बोधेगाव तालुका होणे गरजेचे अाहे. परिसरातील गावे मिळून बोधेगावला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळण्यासाठी प्रसंगी जनमताचा रेटा वाढवू, असे सांगत परिसरातील गावांचे ग्रामसभेचे ठराव घेऊन पालकमंत्र्यांना साकडे घालण्याचा निर्धार सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला. 


'बोधेगाव स्वतंत्र तालुका झाला पाहिजे' या विषयावर राजगड प्रतिष्ठानतर्फे बन्नोमा दर्ग्यात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केदारेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, माजी जि. प. सदस्य प्रकाश भोसले, माजी मंडळाधिकारी दत्तात्रय घोरतळे, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद शिंदे, माजी सरपंच विष्णू वारकड, राम अंधारे, माजी उपसरपंच भाऊराव भोंगळे, प्रभाकर हुंडेकरी, भाजपचे रामकाका केसभट, मुसाभाई शेख, बन्नोमा यात्रा पंच कमेटीचे सचिव पाटीलबा तांबे, अस्मानराव घोरतळे, केदारेश्वरचे कार्यकारी संचालक रमेश गर्जे, मयूर हुंडेकरी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भाजपचे माजी जि. प. सदस्य नितीन काकडे होते. 


नगर जिल्ह्याच्या विभाजनाबाबत शासन सकारात्मक अाहे. तशी घोषणा पालकमंत्री राम शिंदे यांनी केली. त्यामुळे सुमारे तीस वर्षांपासून तालुका निर्मितीची मागणी असलेल्या बोधेगावकरांच्या आशा पल्लवित झाल्या. बोधेगाव तालुका निर्मितीच्या मागणीवर जागृती व्हावी, याकरिता राजगड प्रतिष्ठानने चर्चासत्र घेतले. बोधेगाव तालुका व्हावा, ही मागणी युती सरकारच्या काळात अंतिम टप्प्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय खुलासाही मागितला होता. मात्र, अचानक ही प्रक्रिया बंद पडली. कित्येक वर्षांपासूनची ही मागणी पूर्ण होण्याकरिता जनतेने आता शासनावर दबाव वाढवला पाहिजे. ११३ गावांच्या विस्ताराने मोठ्या असलेल्या शेवगाव तालुक्याला सेवा पुरवताना प्रशासनास मोठी कसरत करावी लागते. बोधेगावचा परिसरातील ३५ ते ४० खेड्यांचा दैनंदिन संपर्क असतो. दुर्गम भाग व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या परिसरातील नागरिकांना न्यायालयीन, महसूल, खरेदी-विक्री, पंचायत समिती, तसेच विविध शासकीय कार्यालयांशी संबंधित कामे करण्यासाठी प्रथम बोधेगावला यावे लागते आणि नंतर शेवगावला लागते. त्यात त्यांचा मोठा वेळ व पैसा खर्च पडतो. परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याने या कामासाठी कृती समिती स्थापन करून त्यामार्फत लढ्याची तयारी ग्रामस्थांनी ठेवली असून त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या तन-मन-धनाची तयारी ठेवली असल्याचे काकडे, भोसले, केसभट, अंधारे, घोरतळे, भोंगळे, हुंडेकरी यांनी सांगितले. 


अंनिस सय्यद, महादेव घोरतळे, प्रकाश गर्जे, विकास इलग, दीपक घोरतळे, संजय खोले, अमोल घोरतळे, सचिन वसे, सुभाष अकोलकर, गणेश उगले, सुनील चव्हाण, पप्पू ढेसले यांनी चर्चासत्रासाठी परिश्रम घेतले. प्रास्ताविक पी. जी. तांबे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रमोद तांबे यांनी केले. 


महसूलचा अ वर्ग दर्जा 
बोधेगावला महसूलचा अ वर्ग दर्जा आधीच मिळाला असून दूरसंचार व महावितरणतर्फे शहरी बिल वसुली होत आहे. नगर दक्षिण जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेला शेवगाव हा एकमेव तालुका आहे. पथदर्शक योजना म्हणून सरकारने ज्याप्रमाणे मराठवाडा व विदर्भात छोट्या गावांना तालुक्याचा दर्जा दिला, तोच निकष लावून शेवगाव व पाथर्डी या दोन तालुक्यांतील गावे मिळून सतत दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बोधेगावला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा. त्यामुळे विकासाला मोठी चालना मिळेल.
- प. ल. तांबे, राजगड प्रतिष्ठान, बोधेगाव.

बातम्या आणखी आहेत...