आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसामुळे हाहाकार : शिर्डीत शासकीय विश्रामगृह, पोलिस ठाणे पाण्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिर्डी व परिसरात गुरुवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. नगर-मनमाड महामार्गावरील शासकीय विश्रामगृह व पोलिस ठाण्यात पाणी शिरल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आत प्रवेश करण्यासाठीही मोठी कसरत करावी लागली. महामार्गाला लागून असलेल्या गटारावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने पाणी साठले. 


वादळी वाऱ्यासह तब्बल तीन तास पडलेल्या पावसाने अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने लोकांची तारांबळ उडाली. झोपडपट्टीतील नागरिकांना मंदिर तसेच मिळेल त्या ठिकाणी विसावा घ्यावा लागला. शासकीय विश्रामगृहात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले. विश्रामगृहासह शेजारी असलेल्या पोलिस ठाण्याला पाण्याने वेढले होते. ग्रामस्थांनी पाणी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या बाजूच्या गटारावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले असून साईड गटारी पूर्णतः बुजल्या आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. शहरातील मातोश्रीनगर, आंबेडकरनगर, वीज उपकेंद्र, नगरपालिकेचा साठवण तलाव, हॉटेल सन एन सँड, तसेच रीवा सूट्स (प्रिती गोराडिया) परिस या ठिकाणांची नगराध्यक्ष योगिता शेळके, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, जगन्नाथ गोंदकर, पोपटराव शिंदे, रवींद्र गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे आदींनी पाहणी केली. शहरात आपत्कालीन परिस्थिती उद््भवू नये, म्हणून उपाययोजना व यंत्रणा तयार असल्याचे नगराध्यक्ष शेळके यांनी यावेळी बोलताना सांगितले. 


मिरी परिसरात समाधानकारक पाऊस 
करंजी : गेल्या आठवड्यापासून प्रचंड उकाड्याने मिरी परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. गुरुवारी व शुक्रवारी सलग दोन दिवस समाधानकारक पाऊस झाल्याने वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. सकाळपासून निरभ्र असलेले आकाश संध्याकाळी पाचच्या सुमारास काळ्याभोर ढगांनी दाटून आले. जोराचे वारे वाहू लागले. काही क्षणांतच जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास चाललेल्या या पावसामुळे रस्त्यांवरून पाणी वाहू लागले होते. काहीवेळ वाहतूकही ठप्प झाली होती. पावसाच्या आशेने मिरी परिसरात गेल्या महिन्याभरापासून शेतीच्या मशागतीला वेग आला होता. अनेक शेतकऱ्यांनी शेतात नांगरणी करुन ठेवली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या हंगामात कापूस, बाजरी, कांदा यासारख्या पिकांची लागवड करण्यावर या भागातील शेतकरी जास्त भर देत आहेत. येत्या दोन दिवसांत पेरणीच्या कामाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. 


मृग नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी राहुरीत पाऊस 
राहुरी शहर : तब्बल तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मृग नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी राहुरीत पावसाचे दमदार आगमन झाले. हा पाऊस खरिपाच्या पिकांना काही प्रमाणात दिलासा देणारा ठरणार आहे. राहुरीत ३२ मिलिमीटर, मुळानगर ९, कोतूळ १०, तर वांबोरी येथे ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने पाठ फिरवल्याने मुळा धरणाच्या राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव या लाभक्षेत्रातील शेतकरी, तसेच धरणावर अवलंबून असलेल्या १० प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांवरील लाभार्थींच्या नजरा चातक पक्षाप्रमाणे पावसाकडे लागल्या होत्या. वातावरणातील बदल पाहता पाऊस येण्याचे अंदाज रोजच बांधले जात होते. मात्र, पावसाने १५ दिवस हुलकावणी दिली. भारतीय हवामान खात्याच्या राहुरी कृषी विद्यापीठातील हवामान विज्ञान वेधशाळेने गेल्या पंधरवाड्यात पावसाच्या आगमनाचे अंदाज दिले होते. मात्र, पाऊस झाला नाही. १ जूनला बिगर मोसमी पावसाने राहुरी तालुक्यात तासभर हजेरी लावली होती. या पावसाच्या भरवशावर काही भागात कपाशी व सोयाबीनच्या पेरण्या झाल्या. काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागती झाल्या. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. गुरूवारी (२१ जून) रात्री ९ वाजता तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाल्याने खरीप पेरणीच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सुखावला. मुळा धरणात शुक्रवारी ४ हजार ७६७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. मागील वर्षी या दिवशी धरणातील पाणीसाठा ५ हजार ५०० दशलक्ष घनफूट होता. १६ जुलैला पाणलोट क्षेत्रात असलेल्या कोतूळकडून मुळा धरणात पाणी दाखल झाले होते. शुक्रवारपासून आद्रा नक्षत्राला प्रारंभ झाला. पुढील आठवडाभरात समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठातील भारत मौसम विज्ञान विभागाच्या वेधशाळेने वर्तवला आहे. 


पुणे-नाशिक महामार्गावर झाले पाणीच पाणी... 
संगमनेर : तालुक्यात गुरुवारी सर्वदूर झालेल्या पावसामुळे पठार भागातील महामार्गासह सर्वत्र पाणी साचल्याने या रस्त्याने वाहनांवरुन जाणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. संगमनेर तालुक्यात गुरुवारी मेघगर्जनेसह सायंकाळी पाचनंतर सुमारे दीड तास झालेल्या पावसाने तालुक्याच्या पठार भागातील केळेवाडी, घारगाव, बोटा, डोळासणे, पोखरी, बाळेश्वर, ढोरवाडी, गुंजाळवाडी, सावरगाव तळ या गावांसह महामार्गाला झोडपले. सुमारे दीड तास झालेल्या या पावसाने शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. काही गावांमधील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या पावसाने शिवार रस्त्यांचे व महामार्गाचे रुपांतर तळ्यात झाले होते. आंबी खालसा ते घारगाव या मार्गावरील पूल पहिल्या पावसातच जलमय झाला होता. महामार्ग प्रशासनाने रस्त्याचे काम करताना एकल घाटातील साईट गटारी अर्धवट ठेवल्याने, तसेच त्यात गुंतलेल्या दगडांमुळे पाणी साचल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वहात होते. महामार्गावरील बोटा परिसरातील हॉटेल कामत, घारगाव पल, डोळासणे पूल, आडवा ओढा येथे सखल भागात पाणी साचल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे साचलेले पाणी, विंडस्किनवर उडाल्याने चालकांची त्रेधा उडाली. अद्याप बऱ्याच ठिकाणी अपूर्ण असलेले महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...