आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा पाणलोटात पुन्हा अतिवृष्टी; धरण ७५ टक्के भरले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- सह्याद्री पर्वतरांगेत हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी वसलेल्या कुमशेत, पाचनई, पेठाचीवाडी, अंबित, तसेच कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या जहागीरदरावाडी, बारी, वारंघुशी आणि भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील घाटघर व रतनवाडीसह संपूर्ण परिसराला रविवार, सोमवारनंतर मंगळवारीही अतिवृष्टीचा तडाखा बसला. 


२३ जूनला झालेल्या विक्रमी ३५३ मिलिमीटर अतिवृष्टीची पुनरावृत्ती सलग तीन दिवस कमी-जास्त प्रमाणात पहायला मिळाली. मंगळवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासांत घाटघरला २५८ व रतनवाडीत २४३ मिलिमीटर म्हणजे तब्बल १० इंच पाऊस पडला. पांजरे येथे ८ व भंडारदरा धरण परिसरात ६ इंच पावसाची नोंद झाली. सोमवारी घाटघर परिसरात १४ इंच व रविवारी ११ इंच पाऊस झाला होता.

 
अतिवृष्टीमुळे आदिवासी भागातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. काही ठिकाणी भातशेतीचे नुकसान झाले असून बांध फुटले आहेत. वाढलेल्या थंडीमुळे पशुधनला मोठा धोका निर्माण झाला आहे. 


मंगळवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत पांजरे १८९, निळवंडे ४५, आढळा १०, अकोले ३९, कोतूळ ३१, संगमनेर १७, ओझर २५, श्रीरामपूर २२, मुळा धरण ७, निमगाव भोजापूर धरण (तालुका सिन्नर) ९ व पैठण येथील जायकवाडी धरणावर ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 


रविवारपासूनच्या गेल्या तीन दिवसांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे ३० इंच पावसाची नोंद झाली. यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात घाटघरला २४९२ व रतनवाडीस २४५७ मिलिमीटर पाऊस झाला. पांजरे येथे १७४५ व भंडारदरा येथे १५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. मंगळवारी सकाळी सहा वाजता पाणीसाठा ७८३० दलघफूवर (७०.९३ टक्के) व निळवंडे धरणाचा पाणीसाठा २०२५ दलघफूवर (२४.३० टक्के) पोहोचला. भंडारदरा धरणात २४ तासांत तब्बल ८७६ दलघफू व या पावसाळ्यात ७१४७ दलघफू नव्याने पाणी आले. निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची अशीच परिस्थिती असून धरणसाठ्यात २४ तासांत नव्याने ३८६ दलघफू व या पावसाळ्यात ३५१३ दलघफू पाणी आले. मध्यंतरी शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. 


मुळा नदीला आलेला पूर कायम आहे. कोतूळ येथे मुळा नदी १५७७६ क्युसेकने वाहते आहे. त्यामुळे मुळा धरणाचा पाणीसाठा १००४८ दलघफूवर (३८.६४ टक्के) पोहोचला आहे. पैठण येथील नाथसागर (जायकवाडी) धरणातील साठा ४०.४७६ टीएमसी (३९.४० टक्के) असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा १४.४१० टीएमसी (१८.७९ टक्के) आहे. सिन्नर तालुक्यातील भोजापूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे मंगळवारी प्रथमच २७ दलघफू नव्याने पाणी आल्याने धरणातील पाणीसाठा ७.४७ टक्के झाला आहे. या धरणातून सिन्नर व संगमनेर तालुक्यातील लाभक्षेत्राला सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो. नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर जवळून गोदावरी नदीचा प्रवाह २९५९४ क्युसेकने सुरू आहे. भीमा नदीच्या प्रवाहात वाढ करण्यात आली असून दौंडपूल येथे ५४१६६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 


बिगर आदिवासी भागातून पावसाचे प्रमाण तुलनेत अत्यल्प आहे. निळवंडे धरणावर ३४३, देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्प परिसरात ११५, अकोले येथे ३३८ व कोतूळ येथे १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे लक्षात घेता तालुक्याच्या बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागाच्या तुलनेत फक्त ५ ते १० टक्के पाऊस पडला आहे. देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्पात अद्याप नवीन पाणी आलेले नाही. 


पर्यटकांची गर्दी वाढली 
पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे सध्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहेत. कोलटेंभे, रतनवाडी, पांजरे, घाटघर, उडदावणे येथे कातळकड्यावरून कोसळणारे धबधबे पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करू लागले आहेत. घाटघर, रतनवाडीचा सर्व परिसर धुक्याने वेढला आहे. हरिश्चंद्रगड, पाचनई, अंबित, शिरपुंजे, कुमशेत, खडकी, लव्हाळी या भागालाही पावसाने झोडपून काढले आहे. भंडारदरा, कळसुबाई, हरिश्चंद्रगड परिसरातून सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून भंडारदरा व मुळा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...