आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथांचा जयजयकार करत शेकडो नाथभक्त पंढरपूरकडे रवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ दिंडीने सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल व पोलिस उपअधीक्षक पौर्णिमा बांदल यांच्या हस्ते नाथांच्या पादुकांची महापूजा होऊन दिंडी सोहळ्यास प्रांरभ झाला. पूजन, ग्रामप्रदक्षिणा व नाथांचा जयजयकार करत शेकडो नाथभक्त पंढरपूरकडे रवाना झाले. 


नाथसंप्रदायाच्या सर्वच दिड्यांना वारकरी संप्रदायात मानाचे स्थान आहे. ग्रामप्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून महिलांनी दिंडीचे स्वागत केले. दिंडी प्रस्थानाच्या वेळी देवस्थान समतीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, सचिव सुधीर मरकड, सहसचिव ज्योती मरकड, विश्वस्त शिवाजी मरकड, मधुकर साळवे, अप्पासाहेब मरकड, माजी सरपंच बाबासाहेब मरकड, अशोक महाराज मरकड, रवींद्र अरोळे, सचिन मरकड, डॉ. रमाकांत मडकर आदींसह अाबालवृद्ध, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सरपंच रखमाबाई मरकड यांच्या वतीने वारकऱ्यांसह सर्व मान्यवरांना अल्पोपाहार देण्यात आला. दिंडी चालली चालली...चालली पंढरपुरा, विठू तुझ्या झेंड्याचा भगवाच रंग, विठुचा गजर हरिनामाचा,' 'ये गं ये गं विठामाई', 'विठू माझा लेकुरवाळा'यासारखे अभंग, गवळणीचे गायन करत मढी येथील भजनी मंडळीनी भाविकांना मत्रमुग्ध केले. पुंडलिक वरदे व हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय, या हरिभक्तांच्या जयघोषाने मढी परिसर दुमदुमून गेला. नाथांच्या दिंडीतून चालताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. 


दोन दिवसांनी दिंडी भिंगारला पोहोचते. तेथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते. दवणा, अत्तर, गुगूळ, धूप, भस्मलेपन अशा वातावरणात भाविक कानिफनाथांच्या दिंडीत नतमस्तक होतात. नाथ संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे चालणारी पूजा व विधी पाहण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी होते. दिंडीबरोबर संत-मंहत असून विसाव्याच्या ठिकाणी कीर्तन, प्रवचन, भजन व भारूडांचे कार्यक्रम होतील. दिंडीसाठी अनेक दानशूर व्यक्ती अन्नदान करणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...